नाशिकच्या ईगतपुरीमधील हायप्रोफाईल रेव्ह पार्टीवर पोलिसांचा छापा, 22 जणांना बेड्या
रेव्ह पार्टीदरम्यान ताब्यात घेतलेल्या महिलांपैकी अनेकांनी साऊथ आणि बॉलिवूड फिल्म इंडस्ट्रीत काम केलंय, काही जण कोरिओग्राफर आहेत तर एक महिला ही परदेशी नागरिक आहे.
नाशिक : नाशिकच्या ईगतपुरीमध्ये सुरु असलेल्या एका हायप्रोफाईल रेव्ह पार्टीवर पोलिसांनी छापा टाकत एकूण 22 जणांना बेड्या ठोकल्या आहेत. यात साऊथ आणि बॉलिवूड फिल्म इंडस्ट्रीतील काहींचा समावेश आहे. गंभीर बाब म्हणजे घटना स्थळावरून पोलिसांनी ड्रग्स आणि इतर साहित्यही ताब्यात घेतलं आहे. विशेष म्हणजे या प्रकरणातही ड्रग्सचे मुंबई कनेक्शन समोर आले असून इगतपुरी हा रेव्ह पार्टीचा अड्डा बनलाय का? असाही प्रश्न आता उपस्थित होतोय.
पर्यटनस्थळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिकमधील ईगतपुरीचे निसर्गसौंदर्य पावसाळ्यात अधिकच खुलून उठते आणि पर्यटकांना आकर्षित करते. खास करून विकेंडला इगतपुरीतील जवळपास सर्वच हॉटेल्स आणि रिसॉर्टची बुकिंग फुल असते. मात्र याच परिसरातील स्काय ताज व्हिला आणि स्काय लगून व्हिलावर शनिवारी रात्री जे काही सुरु होते ते धक्कादायक होतं. या दोन ठिकाणी रेव्ह पार्टी सुरु होती ज्यात 10 पुरुष आणि 12 महिला अशा एकूण 22 जणांचा समावेश होता.रविवारी पहाटे नाशिक ग्रामीण पोलिसांना याबाबत टिप मिळताच स्वतः पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी आपल्या पथकासह इथे छापा टाकला. यावेळी काही महिला आणि पुरुष आक्षेपार्ह अवस्थेत इथे आढळून आले. विशेष म्हणजे ताब्यात घेतलेल्या महिलांपैकी अनेकांनी साऊथ आणि बॉलिवूड फिल्म इंडस्ट्रीत काम केलंय, काही जण कोरिओग्राफर आहेत तर एक महिला ही परदेशी नागरिक आहे.
पोलिसांनी या सर्व 22 जणांना ताब्यात घेत त्यांच्याकडून दारूच्या बाटल्या, हुक्का, कॅमेरा, ट्रायपॉड आणि इतर साहित्य हस्तगत केलंय. धक्कादायक म्हणजे या पार्टीत कोकेनसह इतर दोन ड्रग्सचाही वापर केला जात होता. या रेव्ह पार्टीत चित्रपटसृष्टीशी संबंधित महिला तर होत्याच मात्र इथे ड्रग्सही आढळून आल्याने खळबळ उडालीय. विशेष म्हणजे ड्रग्स पुरवल्याच्या संशयातून एका नायजेरियन नागरिकाला मुंबईतून पोलिसांनी ताब्यात घेतल्याने ड्रग्सचे मुंबई कनेक्शन या माध्यमातून पुन्हा एकदा समोर आलं आहे.
या रेव्ह पार्टी प्रकरणी पोलिसांनी इगतपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा तर दाखल केलाय. मात्र या पार्टीचे आयोजक कोण होते? अजून कोण कोण या पार्टीशी संबंधित आहेत? नायजेरियन नागरिकाने ड्रग्स आणले कुठून? असे अनेक प्रश्न यातून उपस्थित होतायत. विशेष म्हणजे दरवर्षी इगतपुरीत अशा रेव्ह पार्ट्यांचे आयोजन केले जात असल्याने इगतपुरी हा रेव्ह पार्टीचा अड्डा बनलाय का? असाही प्रश्न आता उपस्थित होत असून पोलिसांनी याकडे गांभीर्याने बघणं आणि या प्रकरणाच्या खोलवर जाणं गरजेचं आहे.