उत्तर प्रदेशमधील धर्मांतर प्रकरणाचं नाशिक कनेक्शन, कथित डॉक्टरला यूपी एटीएसकडून अटक
मेडिकल काऊंन्सिल ऑफ इंडियाची परीक्षा पास न होताच कुणालने नाशिकरोड परिसरात दवाखाना सुरू केला होता. त्याच दवाखान्याच्या माध्यमातून तो धर्मांतराचा प्रचार करत असावा अशी शंका आता उपस्थित केली जातेय.
![उत्तर प्रदेशमधील धर्मांतर प्रकरणाचं नाशिक कनेक्शन, कथित डॉक्टरला यूपी एटीएसकडून अटक One arrested from Nashik on suspicion of conversion in Uttar Pradesh उत्तर प्रदेशमधील धर्मांतर प्रकरणाचं नाशिक कनेक्शन, कथित डॉक्टरला यूपी एटीएसकडून अटक](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/09/25/4dd49d3a5c59ee4a2941c0fc75b6bcb8_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
नाशिक : उत्तर प्रदेशमधील धर्मांतर प्रकरणातील संशयावरून उत्तर प्रदेश एटीएसने कुणाल चौधरी याला नाशिकमधून अटक केलीय. धर्मांतराचे पाळंमुळं नाशिकपर्यंत आल्यानं नाशकात खळबळ उडालीय. वैद्यकीय शिक्षण घेणारा निवृत्त आर्मी जवनाचा मुलगा कुणाल या जाळ्यात कसा अडकला, त्याचा सहभाग काय याबाबत चर्चांना उधाण आलंय.
कुणाला चौधरी उर्फ अतिफला उत्तर प्रदेश एटीएसने इतर दोघा साथीदारांसह अटक केलीय. उत्तर प्रदेशातील अवैध धर्मांतर प्रकरणात त्याचा सहभाग असून त्याच्यासह इतरांच्या खात्यात कोट्यवधी रुपये असल्याच्या संशयावरून त्याला अटक करण्यात आलीय. कुणाल हा मूळचा नाशिकचा आहे. नाशिकरोड परिसरातील आनंदनगरच्या विजया अपार्टमेंटमध्ये चौधरी कुटुंबीय 90 च्या दशकापासून राहतात. वडील निवृत्त लष्करी जवान तर भाऊ अभियंता आहे. कुणालला ताब्यात घेतल्यानंतर एटीएसच्या टीमने घरी येऊन चौकशीही केली.
वडिलांनी उधार उसनवारी करत कुणालला वैद्यकीय शिक्षणासाठी रशियात पाठवले आणि तिथूनच स्थानिकांशी त्याचा सबंध हळूहळू कमी झाला. परिसरात देखील तो फारसा कोणाच्या संपर्कात नव्हता. मात्र रात्री दोन अडीच वाजेपर्यंत फोनवर बोलताना स्थानिकांनी अनेकवेळा त्याला बघितले होते. परंतु आशा कुठल्या प्रकरणात त्याचा सहभाग असेल याबाबत पुसटशी शंका देखील स्थानिकांच्या मनात आली नाही. त्याचा लहान भाऊ आणि आई-वडील हे सर्वसाधारण मध्यमवर्गीय मराठी कुटुंब आहे. त्यांचा आणि परिसरातील नागरिकांचा स्नेह देखील बऱ्यापैकी होता. एटीएसच्या कारवाईनंतर सर्वांनाच धक्का बसलाय.
मेडिकल काऊंन्सिल ऑफ इंडियाची (MCI) परीक्षा पास न होताच कुणालने नाशिकरोड परिसरात काही काळासाठी दवाखाना सुरू केला होता. त्याच दवाखान्याच्या माध्यमातून तो धर्मांतराचा प्रचार करत असावा अशी शंका आता उपस्थित केली जातेय. एटीएसच्या करावाईबाबत नाशिक पोलिसांना कुठलीच माहिती नव्हती. मात्र घटनेनंतर उपनगर पोलिसांनी त्याचे वडील अशोक चौधरी यांना चौकशीसाठी बोलावले होते. सुमारे साडेतीन तास चौकशी सुरू होती. आपला मुलगा निरागस आहे, त्याने लग्न केले नाही, धर्मांतर प्रकरणाशी त्याचा काही संबंध नसल्याचा त्याच्या वडिलांचा दावा आहे. तर पोलिसांनी या प्रकरणी मौन बाळगलंय.
उत्तर प्रदेशातील कथित धर्मांतर प्रकरण, विदेशातून त्यासाठी होणारे फंडिंग आणि त्यात नाशिकच्या तरुणांचा सहभाग असल्याचं समोर आल्यानं या घटनेन खळबळ उडाली आहे. या संपूर्ण प्रकरणात कुणाल चौधरी याचा काय सबंध? धर्मांतर करून तो कुणालचा अतिफ कधी आणि का झाला? परदेशात शिक्षणासाठी गेल्यानंतर तिकडे काय घडले? त्याने आतापर्यंत किती जणांचे धर्मातर केले? MCI चे सर्टिफिकेट नसतानाही त्याने दवाखाना कसा थाटला होता? त्यावर तेव्हाच करावाई का झाली नाही? उत्तर प्रदेशाची टीम नाशिकमध्ये दाखल होते तरी नाशिक पोलीस आणि एटीएसला माहिती कशी झाली नाही? ही सर्व प्रश्न सध्या अनुत्तरितच असून पुढील तपासात काय निष्पन्न होतं, नशिकमधून आणखी काही जणांवर कारवाई होते का हे बघणं महत्वाचं आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)