Nashik News : मनमाडमार्गे प्रवास करताय, जरा थांबा! 29 जूनपर्यंत 46 रेल्वेगाड्या रद्द
Nashik News Update : अंकाई किल्ल्याजवळ सुरू असलेल्या कामामुळे 46 गाड्या रद्द करण्यात आल्याने प्रवाशांची चांगलीच तारांबळ उडणार आहे.
Nashik News Update : मनमाडमार्गे प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्वाची बातमी आहे. मनमाडहून मुंबईकडे आणि मनमाडहून पुढे जाणाऱ्या रेल्वेगाड्या 29 जून पर्यंत रद्द करण्यात आल्या आहेत. यामध्ये जवळपास 46 रेल्वे गाड्ंयाचा समावेश असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे.
नाशिकमधील महत्वाचे रेल्वे जंक्शन मानले जाणाऱ्या मनमाड जवळील मनमाड-दौंड मार्गावर अंकाई किल्ला स्टेशन जवळ रुळाचे दुपदरीकरण करण्याचे काम प्रगतीपथावर आहे. या कामासाठी मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. त्यामुळे मनमाड मार्गे जाणाऱ्या तब्बल 46 रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली.
अंकाई किल्ल्याजवळ सुरू असलेल्या कामामुळे 46 गाड्या रद्द करण्यात आल्याने प्रवाशांची चांगलीच तारांबळ उडणार आहे. यातील काही गाड्या 26, 27, 28 तर काही गाड्या 29 जून पर्यंत रद्द करण्यात आल्या असून त्यात राज राज्यराणी एक्सप्रेस, पंचवटी, गोदावरी यासह इतर गाड्यांचा समावेश आहे.
एकाच वेळी तब्बल 46 गाड्या रद्द करण्यात आल्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होणार आहे. शिवाय अंकाई रेल्वे स्थानकाजवळ करण्यात येत असलेल्या कामाचा पंचवटी एक्सप्रेस, गोदावरी एक्सप्रेस या गाड्यांचा काही संबंध येत नसताना देखील त्या का रद्द करण्यात आल्या असा? प्रश्न नाशिक मुंबईकडे अप-डाऊन करणाऱ्या चाकरमान्यांसोबत सर्वसामान्य प्रवाशांना पडला आहे.
दुहेरीकरणाचे काम प्रगतीपथावर
प्रवाशांना चांगल्या सुविधा देण्यासाठी रेल्वे प्रशासनाच्या वतीने मोठ्या प्रमाणात विकास कामे केली जात असून अनेक ठिकाणी रेल्वे रुळाचे दुहेरीकरण करण्यात येत आहे. मनमाड दौंड मार्गावर या अगोदर सिंगल रेल्वे लाईन होती. मात्र तिचे दुहेरीकरण केले जात असून जवळपास याचे काम पूर्णत्वास आले आहे. शेवटचा टप्पा अंकाई रेल्वे स्थानकाजवळ असून तो पूर्ण करण्यासाठी 29 जूनपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. या मेगाब्लॉकमुळे या मार्गावर धावणाऱ्या 46 रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.
या रेल्वे गाड्यांचा समावेश
नांदेड- मनमाड एक्सप्रेस, मनमाड नांदेड एक्सप्रेस, मनमाड - मुंबई एक्सप्रेस, मुंबई-मनमाड एक्सप्रेस, काकीनाडा- शिर्डी, शिर्डी-काकीनाडा सिकंदराबाद- मनमाड एक्सप्रेस, मनमाड -सिकंदराबाद एक्सप्रेस, काचीगुडा एक्सप्रेस, दौंड-निजामाबाद निजामाबाद- पुणे, विशाखापटनम- साईनगर शिर्डी, शिर्डी-विशाखापट्टणम, शिर्डी- कालका, कालका- शिर्डी सीएसएमटी जालना, अजनी-पुणे, सीएसएमटी यासह इतर गाड्यांचा समावेश आहे.