नाशिक : सिन्नर तालुक्यातील वावी येथील महावितरण कंपनीच्या उपकेंद्राला मंगळवारी (21 जून) अचानक लागलेल्या आगीत संपूर्ण कार्यालय जळून खाक झाले आहे. या आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.  


नाशिक जिल्ह्यातील सिन्नरजवळील वावी येथील महावितरण कंपनीच्या उपकेंद्राला ही आग लागली. दरम्यान अचानक लागलेल्या आगीने रौद्ररुप धारण केल्याने तारांबळ उडाली. त्यात कार्यालयातील लाखो रुपयांच्या वस्तू जळून खाक झाल्या, ऐनवेळी वरुणराजाने हजेरी लावल्यामुळे आग विझवण्यात बरीच मदत झाली.


सिन्नर तालुक्यातील वावीसह दुसंगवाडी, पांगरी असे एकूण तीन फिडर असून त्यावर एकूण 11 गावे जोडली आहेत. अशा परिस्थितीत पावसामुळे आणि अचानक आलेल्या उच्च दाबामुळे वावी वीज उपकेंद्रातील दुसंगवाडी फिडरने अचानक पेट घेतला. त्याचे रुपांतर मोठ्या आगीत होऊन संपूर्ण कार्यालय जळून खाक झाले. 


यावेळी येथील लाईनमन अक्षय खुळे आणि येथील प्रभारी नियंत्रक सुयोग धुमाळ हे घटनास्थळी उपस्थित होते. मात्र आगीचे प्रमाण अधिक असल्याने या कर्मचाऱ्यांची मोठी धांदल उडाली. त्यांनी स्थानिक तरुणांना संपर्क करत आग विझवण्यासाठी प्रयत्न केले. तर याचवेळी पाउस सुरु झाल्याने आग विझवण्यासाठी मदत झाली. 


दरम्यान सहाय्यक वीज अभियंता अजय सावळे यांनी तात्काळ अग्निशमन दलाला घटनेची माहिती दिली. यानंतर बंब दाखल झाल्यानंतर तासाभरानंतर आग आटोक्यात आली. मात्र तोपर्यंत कार्यालयातील किमती साहित्य जळून खाक झाले.


वावी वीज वितरण कार्यालयाच्या उपकेंद्रावर अचानक उच्च दाब आल्याने दुसंगवाडी फिडरवर अति दाबामुळेच कदाचित ही घटना घडली असावी. तातडीने टेस्टिंग तंत्रनिकेतन वायरमन बोलावून वावीसह तिन्ही फिडरवरील वीज रात्री उशिरापर्यंत सुरळीत करण्याचा प्रयत्न चालू होता.


इतर महत्त्वाच्या बातम्या