Nashik News Updates : नाशिक शहराजवळील चामरलेणीवर पर्यटनासाठी गेलेली महिला पाय घसरून पडल्याने खोल दरीत कोसळली. यावेळी घटनास्थळावर असणाऱ्या दोन डॉक्टरांच्या समयसुचतेमुळे महिलेला वाचविण्यात यश आले आहे. 


सध्या पावसाचे वातावरण असल्याने रविवारची सुट्टी घालविण्यासाठी हजारो पर्यटक चामर लेणीवर फिरण्यासाठी येतात. चामरलेणीवर जाण्यासाठी पायऱ्यांच्या मदतीने पर्यटक माथ्यावर जातात. तर वरती गेल्यावर डोंगराला चक्कर मारण्यासाठी पायवाटेचा आधार घ्यावा लागतो. यावेळी चामर लेणी पर्यटकांच्या गर्दीने फुलून गेल्याचे पाहायला मिळाले. पायवाट अरुंद असल्याने अनेकदा लक्ष विचलित  झाले तरी बाजूला खोल दरीत कोसळण्याची भीती असते.


दरम्यान याच अरुंद वाटेवरून जात असताना नाशिकमधील एक महिला जात असताना पाय घसरून खोल दरीत कोसळली. यावेळी महिलेसोबत असणाऱ्या नातेवाईकांसह इतर पर्यटकांना काय करावे सुचत नव्हते. अशी परिस्थिती असतानाच या ठिकाणी फिरण्यासाठी गेलेल्या दोन डॉक्टरांना हा प्रकार समजला. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत दोन्ही डॉक्टरांनी धाडस करीत दरीत उतरले.


दरीत उतरल्यानंतर त्यांना महिला बेशुद्ध अवस्थेत पडलेली दिसून आली. या महिलेच्या हातापायाला दुखापत झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.त्यांनी क्षणाचाही विलंब न करता त्वरित प्राथमिक उपचार देत महिलेला शुध्दीवर आणले. वरील नातेवाईकांनी तात्काळ रुग्णवाहिकेला माहिती देत घटनास्थळी येण्यास सांगितले. 


दरम्यान दोन्ही डॉक्टरांनी शिताफीने महिलेस वरती आणले. यानंतर रुग्णवाहिकेच्या माध्यमातून उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले. या दोघा डॉक्टरांनी दाखविलेल्या तत्परतेमुळे महिलेचे प्राण वाचल्याने नातेवाईकांनी आभार मानले.


वनविभागाकडून वेळोवेळी आवाहन
नाशिकमधील पांडव लेणी, चमरलेणी, हरिहर गड या पर्यटनस्थळी यापूर्वीही पर्यटक दरीत कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. मात्र अनेकदा पर्यटक जीव धोक्यात घालून चढाई करत असतात. याबाबत वेळोवेळी वनविभाग तसेच ट्रेकर्सकडून याबाबत आवाहन केले जाते. तरीदेखील पर्यटकांकडून काळजी घेत जात नसल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.