Nashik News : नाशिकमधील पर्यावरण प्रेमींच्या संघर्षाला यश आले असून आता वृक्ष तोड करणे भोवणार आहे. नाशिक शहर परिसरात बेकायदेशीर वृक्षतोड केल्यास एक लाख रुपये पर्यंतचा दंड भरावा लागणार असून जेलची हवाही खावी लागू शकते.
नाशिक शहर परिसरात वृक्षांची कत्तल होण्याचे प्रमाण वाढले आहे. याबाबत नुकताच महापालिकेच्या वतीने नाशिकरोड भागात कारवाई करून नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांचे चिरंजीव अजिंक्य गोडसे यांच्यासह एकावर दंडात्मक कारवाई करून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया झाली होती. यासह पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर काही लोक छाटणीच्या नावावर वृक्षांची कत्तल करत आहे. यामुळे महापालिका उद्यान विभाग ऍक्शन मोडवर आला असून विनापरवानगी वृक्ष तोडल्यास कायद्यानुसार त्यांच्यावर दंडाची कारवाई होऊन गुन्हे दाखल करण्यात येणार आहे.
दरम्यान महाराष्ट्र (नागरी क्षेत्र) झाडांचे संरक्षण व जतन अधिनियम 1975 चे कलम 8 अन्वये नागरी क्षेत्रावरील (खाजगी, शासकीय) वृक्ष तोडण्यावर प्रतिबंध घातला आहे. परंतु काही वृक्ष धोकादायक झाली असल्याने जिवितांस व वित्तास हानीकारक ठरत असल्याने तोडणे आवश्यक असतात. तर काही वृक्ष ही विकास कामांमध्ये अडथळा ठरत असल्याने तोडणे आवश्यक असतात. अशा परिस्थितीत अधिनियमातील तरतुदी प्रमाणे वृक्ष तोडणे बाबतच्या प्रस्तावांवर निर्णय होऊन आवश्यकते प्रमाणे वृक्ष तोडण्यासाठी भरपाई वृक्ष लागवड करण्याच्या अटीवर वृक्ष तोडणेस मंजुरी दिली जाते. मात्र सध्या काही अवैध वृक्षतोड होत असल्याचे प्रशासनाला आढळुन आले आहे. त्यानुसार शहरातील नागरीक व इमारती उभ्या करणारी मंडळी हे वृक्ष तोडण्याची परवानगी न घेता परस्पर वृक्षतोड करत आहे, किंवा वृक्षांचा विस्तार कमी करत आहे. त्यामुळे महापालिकेच्या उद्यान विभागाने आता कडक कारवाईचा इशारा दिला आहे.
नाशिक मनपा उद्यान विभागाचे उपायुक्त विजयकुमार मुंडे म्हणाले की विनापरवानगी व अवैधरित्या वृक्षतोडल्यास वृक्ष कायदा 1975 चे कलम 21 नुसार विनापरवानगी वृक्ष तोड करण्यास दंड करण्याची व सोबतच गुन्हा दाखल करण्याची तरतुद आहे. त्यानुसार प्रति वृक्ष जास्तीत जास्त 1 लाख रुपयांपर्यत दंड व एक आठवडयापासुन एक वर्षापर्यत कारावासाची शिक्षा होऊ शकते. तरी नागरीकांनी धोकादायक व बांधकाम बांधित वृक्षांची तोड करण्यासाठी अथवा त्यांची छाटणीसाठी रितसर परवानगी घ्यावी, अन्यथा कायदेशिर करवाई करण्यात येईल.
खासदार पुत्राने भरला दंड
शिवसेना खासदार हेमंत गोडसे यांचे पुत्र अजिंक्य गोडसे आणि योगेश ताजनपुरे यांच्यावर अखेर वृक्ष प्राधिकरण समितीची परवानगी न घेता तब्बल सात वृक्षांची अवैध कत्तल केल्याप्रकरणी पालिकेच्या उद्यान विभागाने नाशिक रोड पोलिसात अदखलपात्र गुन्हा दाखल केल्यानंतर खासदार पुत्र आले आहेत. गोडसे आणि ताजनपुरे यांनी उद्यान विभागाने सात वृक्षांच्या विनापरवानगी तोड केल्याप्रकरणी केलेला चार लाख वीस हजार रुपयांच्या दंडाची रक्कम भरली आहे.
आतापर्यंत सहा लाख साठ हजारांचा दंड वसूल
नाशिक महापालिकेने अवैध वृक्षतोड विरोधात गुन्हा दाखल करण्यासही दंडात्मक कारवाईची तरतूद केल्यानंतर आत्तापर्यंत तीन प्रकरणांमध्ये सहा लाख 60 हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे. नाशिक रोड येथील जास्त नगर भागात दोन ट्रिप वृक्षांचा विस्तार विनापरवानगी कमी केल्यावरून संबंधितास एक लाख 40 हजारांचा दंड केला आहे, तर एका ठिकाणी झाड वाढवण्यासाठी संबंधितांनी खोडाभोवती काम दिले नाही. त्याला लाखाचा दंड केला आहे. तर खासदार पुत्राला ही 4 लाख 20 हजार दंड केल्यामुळे अवैध वृक्षतोडीला आळा बसेल असा दावा केला जात आहे.