नाशिक : एका सोशल मीडिया पोस्टवरून विद्यार्थ्याला झालेली महिन्यापेक्षा जास्त कैद पुरेशी असल्याचे सांगत शरद पवारांविरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट करणा-या विद्यार्थ्याला हायकोर्टाने अखेर जामीन मंजूर केला आहे. काही दिवसांपूर्वी शरद पवार यांच्याविषयी आक्षेपार्ह पोस्ट करण्यावरून निखिल भामरे यास अटक करण्यात आली होती. त्यामुळे भामरेचे नाव सोशल मीडियावर नाव चर्चेत होते. भामरेच्या त्या पोस्टनंतर राज्यभर आंदोलनं करण्यात येऊन कडक कारवाई करण्यात यावी यासाठी वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हाही दाखल करण्यात आला होता.
दरम्यान महिन्याभराच्या जेलनंतर नाशिकमधील 22 वर्षीय निखील भामरेची सुटका करण्यात आली आहे. हायकोर्टाने याबाबत सोशल मीडिया पोस्टवरून विद्यार्थ्याला झालेली महिन्यापेक्षा जास्त कैद पुरेशी असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे भामरे यास जामीन मंजूर करण्यात आला आहे.
निखिल भामरे विरोधात राज्यभरात एकूण सहा गुन्हे दाखल झाले होते. यापैकी दोन गुन्ह्यात मुंबई उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर तर अन्य तीन गुन्ह्यात अटक न करण्याचे निर्देश दिले असून अन्य एक गुन्ह्यात यापूर्वीच सत्र न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात आला आहे.
काय आहे प्रकरण?
नाशिकमधील निखिल भामरे नामक फार्मासिस्ट तरुणानं शरद पवारांविरोधात सोशल मीडीयावर एक आक्षेपार्ह पोस्ट केली होती. जितेंद्र आव्हाड यांनी या पोस्टचा स्क्रीनशॉट ट्विटरवरुन शेअर केला होता. ज्यात म्हटलं होतं की, 'वेळ आली आहे बारामतीच्या गांधीसाठी, बारामतीचा नथुराम गोडसे तयार करायची. बाराचाकाका माफी माग' या आशयाचं ट्वीट भामरेनं केलं होतं. त्यानंतर ठाणे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांच्या तक्रारीनंतर निखिल भामरेविरोधात ठाणे पोलिसांत गुन्ह्याची नोंद करण्यात आली. या तक्रारीवरून 18 मे रोजी त्याला अटक करण्यात आली. त्यानंतर ठाण्यापाठोपाठ नाशिक आणि अन्य दोन ठिकाणी भामरेंविरोधात समान गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.