नाशिक : ग्राम विकासातूनच देश संपन्न घडू शकतो असे स्वप्न महात्मा गांधींनी पाहिले होते आणि हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी परमपूज्य गुरुमाऊली आण्णासाहेब मोरे आज प्रयत्नशील आहेत’ असे गौरवोद्गार केंद्रीय गृह  आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी काढले. आज श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर, नाशिक येथील श्री स्वामी समर्थ गुरुपीठात संपन्न झालेल्या सद्गुरू प.पू.मोरेदादा चॅरिटेबल हॉस्पिटलच्या शिलापूजन सोहळ्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थित राहून हजारो सेवेकर्‍यांशी मार्गदर्शनपर संवाद साधला.
     
गृहमंत्री अमित शाह यावेळी म्हणाले की, "आजच्या सोहळ्यात मी गुरुपीठात उपस्थित राहणार होतो, परंतु काही अपरिहार्य कारणास्तव मला दिल्लीत राहवे लागत असल्याने मी आपल्या सर्वांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंग माध्यमातून संवाद साधत आहे. पण मी स्वत: गुरुमाऊलींचे आशीर्वाद घेण्यासाठी लवकरच येणार आहे, असे सांगून सेवामार्गाच्या कार्याचे तोंड भरुन कौतुक केले. ते म्हणाले, ‘नाशिक,  त्र्यंबक नगरीचे आगळे वेगळे महत्व आहे. रामायण कालीन घटनांची साक्षीदार ही भूमी आहे. अशा पावन भूमीत गोर-गरिबांना वैद्यकीय सेवा देण्यासाठी सर्व आत्याधुनिक सुविधा असलेले हॉस्पिटल गुरुमाऊली उभे करत आहेत, याचा भविष्यात हजारो रुग्णांना लाभ होणार आहे." 


सेवेकऱ्यांच्या एकेक रुपयातून उभे राहिले हॉस्पिटल...
हॉस्पिटलच्या माध्यमातून  सामान्य माणूस एकत्र येऊन किती मोठे काम करु शकतो, हे पण गुरुमाऊलींनी दाखवून दिलेले आहे. कारण करोडो रुपयांचे हे हॉस्पिटल सेवेकर्‍यांच्या एक-एक रुपयातून उभे राहत आहे, याचा ही मला खूप आनंद होत आहे. यात योग, प्राकृतिक चिकित्सा, आयुर्वेद याचाही समावेश असल्याचे गृहमंत्री अमित शाह म्हणाले.      


सेवामार्गाचा जगभर विस्तार 
आज सेवामार्ग महाराष्ट्राच्या बाहेर गुजरात, मध्य प्रदेश, कर्नाटक, दिल्ली, पंजाब, हरियाणा, उत्तराखंड, जम्मू, तमलिनाडू, केरळ असे विविध राज्य आणि भारताबाहेर नेपाल, अमेरिका, कॅनडा, इंग्लंड, युरोप, ऑस्ट्रेलिया, दुबई अशा अनेक देशांमध्ये जाऊन पोहोचला आहे. समाजाला दिशा देण्याची परंपरा सेवामार्ग 70 वर्षांपासून जोपासत आहे. 7000 सेवा केंद्रांच्या माध्यमातून सामाजिक सुधारणा, ग्राम व नागरी विकास अभियान, बालसंस्कार, शेतकरी मेळावे, कृषी गट, जैविक शेती, दुष्काळात शेतकर्‍यांना मदत अशा अनेक कामातून सामान्य जनतेपर्यंत सेवामार्ग पोहोचतो आहे. असे सांगून हे सर्व स्तुत्य उपक्रम अनुभवण्यासाठी मी लवकरच गुरुपीठात येणार असल्याचा पुनरुच्चार अमित शाह यांनी केला.
     
परदेशातील भाविक दाखल
आजच्या सोहळ्यात देशभरातून सेवेकरी आले होतेच परंतु परदेशातून अमेरिका, दुबई, नेपाळ, सिंगापूर, ऑस्ट्रेलिया या देशातूनही सेवेकरी आले होते.