पुण्यापाठोपाठ नाशिकमधील मॉल्समध्येही मोफत कार पार्किंग
मॉल्सचालकांकडून वाहनचालकांची लूट करण्यात येत असल्याचं त्यांनी नमूद केलं होतं. त्यामुळे पुण्यापाठोपाठ नाशिकमध्येही पार्किंग मोफत करण्यात यावी, अशी मागणी नगरसेविका किरण गामणे यांनी केली होती.
नाशिक : पुण्यापाठोपाठ आता नाशिकमध्येही मॉल्समध्ये पार्किंग मोफत करण्यात आली आहे. आज सकाळपासून विविध विषयांवर महापालिकेच्या महासभेत गोंधळ बघायला मिळाला. या गोंधळातच पार्किंगच्या प्रस्तावालाही मंजुरी देण्यात आली.
सिडको परिसरातील शिवसेनेच्या नगरसेविका किरण गामणे यांनी हा प्रस्ताव गेल्या महासभेत मांडला होता. मात्र महासभा तहकूब झाल्याने विषय लांबला होता आणि अखेर आज तो पटलावर आला. मॉल्सचालकांकडून वाहनचालकांची लूट करण्यात येत असल्याचं त्यांनी नमूद केलं होतं. त्यामुळे पुण्यापाठोपाठ नाशिकमध्येही पार्किंग मोफत करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली होती.
शहरातील सर्व मॉल्सना नोटीस बजावण्याचे आदेश महापौरांनी महासभेत दिले असून या निर्णयामुळे नाशिककर चांगलेच खुश झाले आहेत. आता फक्त या निर्णयाची अंमलबजावणी कशी होते हे बघणं महत्वाचं ठरणार आहे.
महापौर रंजना भानसी यांनी प्रस्ताव मंजूर केल्याने शिवसेनेनकडून त्यांचे आभार मानले जात आहे. एवढे दिवस मॉल्सचालकांकडून पार्किंगच्या नावाखाली जी लूट करण्यात आली तो पैसा महापालिकेच्या तिजोरीत कसा जमा होईल यासाठी देखील प्रयत्न केला जाणार आहे.