एक्स्प्लोर
नाशिक मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांची मुंबईत बदली
नाशिक महापालिकेसमोर मुंढेंच्या समर्थकांनी घोषणाबाजी करत भाजप आणि मुख्यमंत्र्यांचा निषेध केला. सर्वसामान्य नाशिककरांनी एकवटत मुंढेंच्या बदलीविरोधात नारे दिले.
नाशिक : नाशिक महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांची मुंबईत बदली झाली आहे. मुंबईतील नियोजन विभागाच्या सहसचिवपदी बदली केल्याचं पत्र मुंढेंना देण्यात आलं. नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे पदभार सोपवून नियुक्तीच्या ठिकाणी जाण्याचे निर्देश तुकाराम मुंढेंना देण्यात आले आहेत.
अपर मुख्य सचिव (सेवा) सीताराम कुंटे यांची स्वाक्षरी असलेलं पत्र तुकाराम मुंढेंना देण्यात आलं. मुंबईतील नियोजन विभागाचं सहसचिवपद रिक्त असल्याने तिथे मुंढे यांची वर्णी लावण्यात आली. यापूर्वी 2010 आणि 2012 मध्ये त्यांची बदली मुंबईत झाली होती. उस्मानाबादचे जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे नाशिक महानगरपालिकेचा पदभार स्वीकारणार आहेत.
लोकप्रतिनिधी आणि मुंढे यांच्यातील टोकाच्या संघर्षानंतर मुंढेंची उचलबांगडी झाल्याची चर्चा आहे. नाशिकचा चेहरामोहरा बदलण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी तुकाराम मुंढेंकडे महापालिका आयुक्तपदाची जबाबदारी सोपवली होती.
नाशिक महापालिकेसमोर मुंढेंच्या समर्थकांनी घोषणाबाजी करत भाजप आणि मुख्यमंत्र्यांचा निषेध केला. सर्वसामान्य नाशिककरांनी एकवटत मुंढेंच्या बदलीविरोधात नारे दिले.
कर्तव्यनिष्ठ आणि शिस्तप्रिय अधिकारी अशी ओळख असलेल्या तुकाराम मुंढे यांची गेल्या बारा वर्षात बदली होण्याची बारावी वेळ आहे. तुकाराम मुंढे यांच्या शिस्तबद्ध, नियमाधारित कामांच्या दंडकामुळे नाशिकमध्ये सत्ताधारी भाजपाची अडचण वाढली होती. काही महिन्यांपूर्वी त्यांच्याविरोधात अविश्वास ठराव मांडण्याचा प्रयत्नही सत्ताधारी भाजपाने केला होता.
नियुक्ती... वाद आणि बदली
नागपूर जिल्हा परिषदेवर 2008 साली सीईओ म्हणून नियुक्ती, त्याच दिवशी त्यांनी शाळेला भेटी दिल्या आणि गैहजर शिक्षकांचं निलंबन केलं. वैद्यकीय कारभारात अनियमितता दिसल्याने काही डॉक्टरांनाही निलंबित केलं. सोलापूरचे जिल्हाधिकारी असताना वाळू माफियांविरोधात कारवाईचा बडगा उगारला. त्यांना वाळू माफियांच्या रोषाचाही सामना करावा लागला. पंढरपूर मंदिर समितीच्या चेअरमनपदी नियुक्ती झाल्यानंतर मुख्यमंत्री सोडून इतरांचं व्हीआयपी दर्शन बंद केलं. नवी मुंबईत महापालिका आयुक्तपदी बदली झाली. नवी मुंबईत आल्यानंतर अनधिकृत बांधकामांवर कारवाई सुरु केली आणि तिथेच तुकाराम मुंढे सत्ताधाऱ्यांच्या निशाण्यावर आले. नवी मुंबईतही त्यांच्याविरोधात अविश्वास ठराव आणण्यात आला. नवी मुंबईतून पुण्यात पीएमपीएमएल अध्यक्षपदी बदली झाली. पुण्यात गेल्यानंतर त्यांनी तोट्यात असलेल्या पीएमपीएमएलचा महसूल वाढवण्यासाठी अनेक पाऊलं उचलली, नियम बदलले आणि नागरिकांना केंद्रस्थानी ठेवून सुविधा दिल्या. पण पीएमपीएमएल कर्मचाऱ्यांच्या निलंबनामुळे त्यांची कारकीर्द पुन्हा एकदा चर्चेत आली. पुण्यातून नाशिक महापालिका आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली. नाशिकमध्ये गेल्यावर त्यांनी केलेली करवाढ अवास्तव असल्याचा आरोप सत्ताधारी भाजपने केला होता. नाशकात नवरात्रीनिमित्त कालिका मंदिरात तुकाराम मुंढे आरतीकरिता पाहुणे म्हणून आले होते. त्यावेळी मंदिरात आणि प्रसाद स्टॉल्सवर त्यांना प्लास्टिक दिसले. राज्यात प्लास्टिकबंदी असूनही मोठ्या प्रमाणात प्लास्टिक पाहून, आयुक्त तुकाराम मुंढे चांगलेच भडकले. कालिका मंदिरात आरती होताच, तुकाराम मुंढे यांनी सर्व प्रसाद स्टॉल्सची अचानक पाहणी केली. संध्याकाळपर्यंत प्लास्टिक वापर बंद न केल्यास, दुकाने हटवू असा इशारा यावेळी मुंढेंनी दिला. इतकंच नाही तर मंदिराबाहेरील रस्त्यावर दुकानांनी अतिक्रमण केल्यास कारवाईचाही इशारा दिला. तुकाराम मुंढेंच्या 12 वर्षात 12 बदल्या महापालिका आयुक्त, सोलापूर (2006-07) प्रकल्प अधिकारी, धारणी (2007) उपजिल्हाधिकारी, नांदेड (2008) सीईओ, नागपूर जिल्हा परिषद (2008) अतिरिक्त आदिवासी आयुक्त, नाशिक (2009) के. व्ही. आय. सी. मुंबई (2010) जिल्हाधिकारी, जालना (2011) जिल्हाधिकारी, सोलापूर (2011-12) विक्रीकर विभाग, सहआयुक्त, मुंबई (2012) आयुक्त, नवी मुंबई महापालिका (2016) पीएमपीएमएल, पुणे (2017) नाशिक महापालिका आयुक्त (2018) मुंबई नियोजन विभाग सहसचिव (नोव्हेंबर 2018)अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
करमणूक
कोल्हापूर
Advertisement