एक्स्प्लोर
दोन हजारांचा चेक घेऊन दाम्पत्याकडून 20 लाखांना चुना
नाशिक : चेकवरील रकमेत फेरफार करुन नाशकात एका दाम्पत्याने दुचाकी वितरकाच्या बँक खात्यातून तब्बल वीस लाख रुपयांची रक्कम काढल्याचा आश्चर्यजनक प्रकार उघडकीस आला आहे. दोन हजारांच्या चेकवरील रकम बदलून वीस लाख काढल्याप्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दिंडोरी रोडवरील शांतीचंद्र गुलाबचंद पांडे यांनी भद्रकाली पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार सप्टेंबर 2016 मध्ये गंजमाळ येथील जितेंद्र ऑटोमोबाइल्सच्या शोरुममध्ये एक दाम्पत्य दुचाकी खरेदीसाठी आलं होते. आपली पत्नी थत्तेनगरमधील एका बँकेची शाखाधिकारी असून तिला दुचाकी घेऊन द्यायची असल्याचे सांगून संबंधिताने दोन हजार रुपये अनामत रक्कम शोरुममध्ये जमा केली.
त्यानंतर दोन दिवसांनी परत येऊन आपल्या दुचाकीचे बुकिंग रद्द करत असल्याचं सांगत जमा केलेल्या पैशांची त्यांनी मागणी केली. त्यांना रोख रकमेऐवजी दोन हजार रुपयांचा धनादेश देण्यात आला. मात्र काही दिवसांनी शोरुम चालकाने आपलं पासबुक तपासलं असता त्यात दोन हजारांऐवजी 20 लाख रुपयांचा धनादेश वटवल्याचे लक्षात आलं.
आरोपी दाम्पत्याविरोधात पोलिसात फसवणुकीचा गुन्हा नोंदवण्यात आला असून चेक गुजरातमधील राजकोट येथील एचडीएफसी बँकेच्या शाखेतून वटवून घेतला गेल्याची माहिती पोलिस तपासात समोर आली आहे.
धनादेश नाशिक रोड मधील पूजा अनंत वाळवे या नावाने देण्यात आला असला तरी प्रत्यक्षात या नावाची महिला अस्तित्वात नसल्याचंही आढळून आलं आहे. पोलिस पथक अधिक तपासासाठी गुजरातकडे रवाना झालं असून फसवणूक करणाऱ्या दाम्पत्याचा शोध घेतला जात आहे.
धनादेशावर खाडाखोड करून दोन हजार रुपयांऐवजी वीस लाख रुपये वटवल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर अक्षरं मिटवणारं पेनही अस्तित्वात आहे की काय, अशी चर्चा सोशल मीडियात सुरु झाली आहे.
रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शक सूचनेनुसार धनादेशाच्या तारखेमधील फेरफार वगळता दुसरे काही बदल असल्यास तो वटवला जात नाही. असं असताना रकमेतील फेरफार केलेला धनादेश वटवला जाताना ही बाब बँकेचे अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांच्या लक्षात कशी आली नाही, हा प्रश्न उपस्थित होत आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
महाराष्ट्र
Advertisement