शौचालयाचा दाखला सादर न केल्याने नांदगाव तालुक्यातील खामगाव ग्रामपंचायतीच्या सरपंचाचे पद रद्द
शौचालय वापरत असल्याचा दाखला सादर न केल्याने नांदगाव तालुक्यातील खादगाव ग्रामपंचायतीच्या संरपंचांच पद रद्द करण्यात आलं आहे.
मनमाड : शौचालयाचा दाखला सादर न केल्याने नाशिकमधल्या नांदगाव तालुक्यातील खादगाव ग्रामपंचायतीच्या संरपंचांच पद रद्द करण्यात आलं आहे. मालेगावच्या अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी हे आदेश दिले आहेत. संगीता शिवाजी वडक्ते असं पद रद्द झालेल्या सरपंचांचे नाव आहे.
2019 मध्ये खादगाव ग्रामपंचायतीची सरपंच पदासाठी थेट निवडणूक झाली होती. पहिल्यांदाच नागरिकांमधून सरपंच निवडला जाणार असल्याने मतदारांमध्ये उत्साह पाहायला मिळाला होता. खादगाव ग्रापंचायतीचं सरपंचपद महिला प्रवर्गासाठी राखीव होतं. या पदासाठी संगीता शिवाजी वडक्ते यांच्यासह अन्य दोन महिलांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले होते.
निवडणूक अर्ज सादर करताना शौचालय वापरत असल्याचा ग्रामपंचायतीचा ठराव आणि प्रतिज्ञापत्र सादर करणे बंधनकारक असते. त्यावेळी संगीता वडक्ते यांनी आपण स्वत:च्या घरात राहत असून घरातीलच शौचालयाचा वापर करतात, असं प्रमाणित करत असलेला ग्रामसभेचा ठराव तसंच संबंधित ग्रामपंचायतीचे शौचालयाबाबतचे पत्र देखील निवडणूक अर्ज दाखल करताना सादर केलं नाही, अशी तक्रार त्यांच्याविरोधात उभ्या असलेल्या महिलेने निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे केली. शिवाय निवडून आल्यानंतर सुद्धा त्यांनी शौचालय वापरत असल्याचं कुठलंही प्रमाणपत्र सादर केलं नाही. त्यामुळे या प्रकरणाची सुनावणी मालेगावच्या अप्पर जिल्हाधिकाऱ्यांसमोर झाली.
यावेळी अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी संपूर्ण कागदपत्रांची तपासणी केली. यादरम्यान संगीता वडक्ते यांनी नामनिर्देशन पत्रासोबत शौचालय असल्याबाबतचा ग्रामसभेचा ठराव आणि पंचायतीचे प्रमाणपत्र दाखल केले नसल्याचं समोर आलं. त्यानंतर महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1058 च्या कलम 14 (1) आणि कलम 16 मधील तरतुदीनुसार संगीता शिवाजी वडक्ते या सरपंचपदी राहण्यास पात्र नसल्याचा आदेश दिला. परिणामी संगीता वडक्ते यांचं सरपंचपद रद्द करण्यात आलं आहे.