रुग्णालय झुकलं, तक्रार मागे; मात्र गर्दी जमवल्याप्रकरणी जितेंद्र भावे यांच्याविरोधात गुन्हा
नाशिकमध्ये अर्धनग्न आंदोलन करणारे आम आदमी पक्षाचे नेते जितेंद्र भावे यांच्याविरोधातील तक्रार रुग्णालयाने मागे घेतली आणि त्यांची सुटका झाली. परंतु गर्दी जमवल्याप्रकरणी त्यांच्याविरोधात कलम 188 अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे.
नाशिक : नाशिकमधील खासगी रुग्णालयाने आकारलेल्या अवाजवी बिलाविरोधात अर्धनग्न आंदोलन करणारे आम आदमी पक्षाचे नेते जितेंद्र भावे यांच्याविरोधात कलम 188 अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. मुंबई नाका पोलीस ठाण्यात भावे यांच्यासह समर्थकांवर कलम 188 अंतर्गत बेकायदेशीर गर्दी जमवल्याप्रकरणी गुन्ह्याची नोंद झाली आहे.
वोकहार्ट हॉस्पिटलने आकारलेले बिल अवाजवी असून डिपॉजिटही परत करत नसल्याचा आरोप करत जितेंद्र भावे यांनी संबंधित रुग्णाच्या नातेवाईकाला सोबत घेत काल (25 मे) दुपारी अर्धनग्न अवस्थेत आंदोलन केलं होतं. शिवाय या संपूर्ण प्रकाराचं फेसबुक लाईव्ह देखील केलं. त्यानंतर जितेंद्र भावे यांना अटक करण्यात आली. त्यांच्या अटकेच्या निषेधार्थ समर्थकांनी काल पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन केलं होतं. त्यामुळे जितेंद्र भावे यांच्यासह समर्थकांवर गुन्हा दाखल झाला आहे.
रुग्णालय प्रशासन झुकलं आणि जितेंद्र भावेंची सुटका
दरम्यान जितेंद्र भावे यांच्या आंदोलनानंतर सोशल मीडियामध्ये हॉस्पिटल आणि पोलिसांविरोधात संतप्त प्रतिक्रिया उमटल्या होत्या. त्यांच्या या आंदोलनासमोर वोकहार्ट रुग्णालय प्रशासन अखेर झुकल. रुग्णालयाने जितेंद्र भावे यांच्याविरोधातील तक्रार मागे घेतली. मग अटकेच्या सात तासानंतर काल रात्री उशिरा जितेंद्र भावे आणि रुग्णाच्या नातेवाईकाची मुंबई नाका पोलीस ठाण्यातून सुटका झाली.
गेल्या काही दिवसांपासून अवाजवी बिल आकारणाऱ्या नाशिकमधील खाजगी रुग्णालयांविरोधात जितेंद्र भावे आवाज उठवत आहेत. जितेंद्र भावे वर्षभर सातत्याने लूट करणाऱ्या दवाखान्याचे वास्तव फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून समोर मांडत आहेत. रुग्णालयात झोपून असलेल्या रुग्णाच्या जेवणाचे बिल लावणे, नऊ रुपयाचे ग्लोव्हज 67 रुपयांना आणि अशी अनेक प्रकरणं जितेंद्र भावे यांनी पुढे आणली आहेत.