कविता राऊतला ठाकरे सरकार नोकरी देऊ शकत नसेल तर काहीतरी गडबड आहे : राज्यपाल कोश्यारी
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पुन्हा एकदा ठाकरे सरकारवर टीका केली आहे.धावपटू कविता राऊतला राज्य सरकार नोकरी देऊ शकत नसेल तर काहीतरी गडबड आहे : राज्यपाल
नाशिक : आंतरराष्ट्रीय धावपटू कविता राऊत हिला राज्य सरकार आणि क्रीडा मंत्री सुनिल केदार नोकरी देऊ शकत नसतील तर काहीतरी गडबड आहे, असं म्हणत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पुन्हा एकदा ठाकरे सरकारवर टीका केली आहे. विशेष म्हणजे आदिवासी भागात शिक्षक मिळत नसतील तसेच शिक्षकांची भरती होत नसेल तर महाराष्ट्र सरकार काय करतय? असाही सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
नाशिकच्या सुरगाणा तालुक्यात भिंतघर येथे आदिवासी सांस्कृतिक भवनच्या इमारतीचा लोकार्पण सोहळा राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते मंगळवारी दुपारी पार पडला. यावेळी विधानसभा उपसभापती नरहरी झिरवाळ, राष्ट्रवादी आमदार नितिन पवार आणि स्थानिक लोकप्रतिनिधी उपस्थित होते. कार्यक्रमात आदिवासी लाभार्थ्यांना वनकट्टे वाटप राज्यपालांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विधानसभा उपसभापती नरहरी झिरवाळ यांनी राज्यपालांकडे या परिसरातील विकासाबाबत मागणी करताच राज्यपालांनी त्यांना देखील भाषणात चिमटा घेत झिरवळ सरकारमध्येही असूनही माझ्याकडे मागणी करतात असं म्हंटल.
काय आहे प्रकरण? सावरपाडा एक्सप्रेस म्हणून ओळखली जाणारी आंतरराष्ट्रीय धावपटू कविता राऊत यांनी काही दिवसांपूर्वी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली होती. राज्य सरकारमध्ये नोकरीसाठी डावललं जात असून अन्याय होत असल्याची तक्रार केली होती.
अर्जुन पुरस्कार प्राप्त कविताने रिओ ओलम्पिकमध्ये देशाच प्रतिनिधित्व केलंय. आजवरच्या तिच्या कामगिरीचा सन्मान करण्यासाठी तिला राज्य सरकारने वर्ग 1 पदावर नोकरी देण्याचं आश्वासन दिलं होतं. त्यासाठी तिने प्रयत्नही केलेत. मात्र, तिच्या पदरी निराशा आली. 2014 पासून पाठपुरवा करूनही आपल्याला डावलल जात आहे. आपल्यानंतर आलेल्या खेळाडूंना राज्य सरकारमध्ये चांगल्या पदावर नोकरी मिळाल्याचा आरोप कविताने केला आहे. शेवटचा पर्याय म्हणून राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेऊन अन्यायाचा पाढा वाचला होता.