एक्स्प्लोर
द्राक्ष उत्पादकांना व्यापाऱ्यांकडून केवळ 8 रुपये किलोचा भाव

नाशिक : ग्रेप्स कॅपिटल अर्थात द्राक्षांची राजधानी अशी ओळख असणाऱ्या नाशकात द्राक्षांचे भाव मातीमोल झाले आहेत. अवघ्या 8 रुपये किलोनं द्राक्षं विकली जात असल्यानं द्राक्ष उत्पादक चिंतेत सापडले आहेत. व्यापाऱ्यांनीही द्राक्षं खरेदीकडे पाठ फिरवल्यानं हजारो एकर बागांमध्ये द्राक्षांचे घड विक्रीविना पडून आहेत. नाशिकसह दिंडोरी, निफाड, पिंपळगाव या भागातही अशीच स्थिती आहे. कांदा, तूर, भाजीपाला, डाळिंब यापाठोपाठ द्राक्षांचेही भाव पडल्यानं नाशिकमधला शेतकरी हवालदिल झाला आहे. यंदा नाशिक जिल्ह्यात 51 हजार 600 हेक्टर क्षेत्रावर द्राक्षबागा उभ्या करण्यात आल्या होत्या. त्यापैकी सर्वाधिक 20 हजार हेक्टर द्राक्षबागा निफाडमध्ये, 15 हजार हेक्टर द्राक्षबागा दिंडोरी तर 7.5 हजार हेक्टर द्राक्षबागा नाशिक तालुक्यात होत्या. एकट्या नाशिक जिल्ह्यात यंदा 25 लाख मेट्रिक टन द्राक्षांचं उत्पादन झालं आहे. सुरुवातीला परदेशात निर्यात आणि देशांतर्गत बाजारात विक्री झाल्यानं उत्पादाकांना चांगले पैसे मिळाले होते. मात्र नोटाबंदी आणि नंतरच्या घटनांमुळे रोख चलन उपलब्ध नसल्यानं व्यापाऱ्यांनी द्राक्षं खरेदीकडे पाठ फिरवली. द्राक्षाच्या बागेला एकरी दोन लाख रुपयांपेक्षा अधिक खर्च होतो. हा सगळा आता कसा भरुन काढायचा असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
बुलढाणा
नाशिक
मुंबई






















