नाशिक मनपा गटनेत्याच्या कार्यालयातील आग आटोक्यात, इमारतीचं फायर ऑडिट कागदोपत्रीच होतं का? अजय बोरस्तेंचा प्रश्न
नाशिक महापालिकेमधील विरोधी पक्षनेते आणि शिवसेना गटनेत्याच्या कार्यालयाला आग लागलेली आग आटोक्यात आली आहे. महापालिकेच्या इमारतींचं फायर ऑडिट कागदोपत्रीच होतात का याचीही चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांनी केली.
नाशिक : नाशिक महापालिकेमधील विरोधी पक्षनेते आणि शिवसेना गटनेत्याच्या कार्यालयाला आग लागलेली आग आटोक्यात आली आहे. पेस्ट कंट्रोल आणि सॅनिटायझेशन केल्यानंतर लगेचच आग लागल्याची माहिती विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांनी दिली. महापालिकेचं फायर ऑडिट झालं नाही, त्यामुळे ही दुर्घटना घडल्याचा आरोप अजय बोरस्ते यांनी केला आहे.
महापालिकेच्या दुसऱ्या मजल्यावर विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांचं कार्यालय आहे. आज सकाळी कार्यालयात पेस्ट कंट्रोल आणि सॅनिटायझेशनचं काम झाल्यानंतर काही वेळातच तिथे शॉर्ट सर्किट होऊन आग लागली. यानंतर अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आणि आग नियंत्रणात आणली. आगीच्या भक्ष्यस्थानी असलेलं साहित्य जळून खाक झालेलं आहे. सुदैवाची गोष्ट म्हणजे आग लागली त्यावेळी शिवसेनेचे कुणीही पदाधिकारी कार्यकर्ते कार्यालयात उपस्थितीत नव्हते.
एरव्ही याच शिवसेना कार्यालयात कार्यकर्त्यांचा राबता असतो. अनेक कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांची विविध कामांच्या निमित्ताने कार्यालयात ये-जा असते. मात्र आज सुदैवाने सॅनिटायझेशनचं काम सुरु असल्याने स्वच्छता कर्मचाऱ्यांशिवाय कार्यालयात कोणीही उपस्थित नव्हतं.
अग्निशमन दलाने काही वेळातच आग आटोक्यात आणली. पेस्ट कंट्रोल करणारा कोण होता, नक्की काय झालं याची चौकशी व्हायला हवी. महापालिकेच्या इमारतींचं फायर ऑडिट कागदोपत्रीच होतात का याचीही चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी अजय बोरस्ते यांनी केली.