(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nashik Weather Update : नाशिक, धुळ्यात हुडहुडी! निफाडला निचांकी तापमान; द्राक्ष बागायतदार चिंतेत
Nashik News : गेल्या काही दिवसांपासून नाशिक शहरासह जिल्ह्यातील तापमानात कमालीची घट झाली आहे. नाशिक आणि निफाड तालुक्यात सलग तीन दिवसांपासून पारा घसरत आहे.
Nashik Weather Update नाशिक : गेल्या काही दिवसांपासून नाशिक शहरासह जिल्ह्यातील तापमानात कमालीची घट झाली आहे. नाशिक आणि निफाड तालुक्यात सलग तीन दिवसांपासून पारा घसरत आहे. निफाडमध्ये 4.4 या निचांकी तापमानाची (Temperature) गुरुवारी नोंद झाली आहे. नाशिकचा (Nashik) पारा गुरुवारी 8.6 अंशावर घसरला आहे.
अचानक वाढलेल्या थंडीमुळे नाशिककर चांगलेच गारठले आहेत. दरवर्षी मकर संक्रांत (Makar Sankrant 2024) झाली की, थंडी हळू हळू कमी होत जाते. यंदा मात्र काहीसे वेगळेच चित्र पाहायला मिळत आहे. मकर संक्रांत झाल्यानंतर यंदा नाशिकच्या तापमानाचा पारा घसरत चालला आहे.
असे आहे नाशिकचे तापमान
गुरुवारी 8.6 अंश सेल्सिअस तापमान नाशिकमध्ये नोंदवले गेले आहे. तर बुधवारी 27 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद नाशिकमध्ये झाली आहे. बुधवारी किमान तापमान 9 अंश सेल्सिअस नोंदवले गेले तर मंगळवारी 27.5 तापमानाची नोंद करण्यात आली आहे.
निफाडमध्ये निचांकी तापमानाची नोंद
निफाडमध्ये गुरुवारी 4.4 या निचांकी तापमानाची नोंद झाली आहे. बुधवारी 5.6, मंगळवारी 6.6 तापमानाची नोंद निफाडमध्ये झाली आहे. यामुळे निफाडचे नागरिक चांगलेच गारठले आहे. तर दुसरीकडे द्राक्ष उत्पादक मात्र चिंताग्रस्त झाले आहेत.
द्राक्षबागा बचावासाठी धुराद्वारे उष्णता
तापमानाचा पारा आणखी खाली आला, तर द्राक्ष मण्यांना तडे जाणे, द्राक्ष वेलींची अन्न तयार करण्याची प्रक्रिया मंदावणे, याबरोबरच भुरी, मावा व करपा रोगांचा प्रादुर्भाव पिकांवर वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे. द्राक्षबागांच्या बचावासाठी बागांत चिपाटे पसरवून धुराद्वारे उष्णता निर्माण केली जात आहे. बोचऱ्या थंडीचा सर्वाधिक सामना ऊसतोड मजुरांना करावा लागत आहे. तालुक्यात सध्या कांदालागवड अंतिम टप्प्यात आली असून, त्यासाठी महिला मजूर दिवस उगवताच घराबाहेर पडत आहेत.
कांदा, गहू, हरभरा पिकांसाठी थंडी पोषक
थंडीत द्राक्षवेलींचे कार्य सुरू राहण्यासाठी पांढरी मुळी व पेशींची अविरत सुरू राहण्यासाठी पहाटे ठिबक सिंचनाद्वारे पाणी देणे आवश्यक असते. पारा आणखी खाली आला, तर द्राक्षबागा वाचविणे अवघड होणार असल्याचे चित्र आहे. तर दुसरीकडे कांदा, गहू, हरभरा पिकांसाठी थंडी पोषक ठरणार आहे.
धुळ्यातही हुडहुडी
धुळे (Dhule) जिल्ह्यात दुसऱ्या दिवशी देखील तापमानाचा पारा 4.6 अंश सेल्सिअसवर स्थिर असून जिल्ह्यात प्रचंड गारठा वाढला आहे..थंडी पासून बचाव करण्यासाठी जागोजागी शेकोट्या पेटल्या असून रात्रीच्या वेळी रस्ते निर्मनुष्य होऊ लागले आहेत. उत्तरेकडून वाहणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे कडाक्याची थंडी वाढली असून पुढील आठवडाभर ही थंडी कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. वाढत्या थंडीच्या पार्श्वभूमीवर लहान मुले आणि वयोवृद्ध नागरिकांनी काळजी घेण्याचे देखील आवाहन करण्यात आले आहे.
आणखी वाचा
Nashik ATS : नाशिकमध्ये एटीएसची मोठी कारवाई; दहशतवाद्यांना निधी पुरवल्याप्रकरणी एकजण अटकेत