नाशिककरांनो सावधान! शनिवारी शहरात पाणीबाणी, आजच जास्त पाणी भरून ठेवा
Nashik Water Supply : नाशिक शहरात येत्या शनिवारी पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तर दुसरीकडे धरणात पाणीसाठा कमी असल्याने नागरिकांवर पाणी कपातीची टांगती तलवार आहे.
नाशिक : शहरातील संपूर्ण पाणीपुरवठा (Water Supply) शनिवारी (दि.13) बंद असणार असून, रविवारी (दि.14) सकाळचा पाणीपुरवठा कमी दाबाने होणार आहे. त्यामुळे नागरिकांना दोन दिवस पाण्याचे नियोजन करून वापरावे लागणार आहे. दरम्यान, शहरात अद्यापही पावसाने ओढ दिली असून, गंगापूर धरण (Gangapur Dam) समूहातील पाणीसाठा दिवसेंदिवस कमालीचा खालावत आहे.
दरम्यान पाणीपुरवठा विभागाकडून मुकणे धरण येथून पाणीपुरवठा करणाऱ्या 700 मि.मी. मुख्य गुरुत्ववाहिनीवर देखभाल-दुरुस्तीची व व्हॉल्व्ह दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे येत्या शनिवारी संपूर्ण पाणीपुरवठा बंद राहील. सुरळीत पाणीपुरवठा करण्यासाठी वरील दुरुस्ती अनिवार्य आहे. त्यामुळे मनपाचे विल्होळी जलशुद्धीकरण केंद्र (मुकणे प्रकल्प) येथून होणारा पाणीपुरवठा बंद राहील. पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य वितरण वाहिन्या, व्हॉल्व्ह बदलणे आदी देखभाल दुरुस्तीची कामे तसेच गंगापूर धरण पंपिंग स्टेशन (Gangapur Dam Pumping Station) येथील उर्वरित कामे करणे आवश्यक आहे.
नाशिक शहरात शनिवारी पाणीबाणी
पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी हे काम करणे गरजेचे आहे. त्यामुळे गंगापूर धरण पंपिंग स्टेशन व मुकणे पंपिंग स्टेशन येथील पंपिंग बंद ठेवावे लागणार आहे. परिणामी, संपूर्ण नाशिक शहराचा पाणीपुरवठा शनिवारी सकाळी 9 वाजल्यापासून पूर्ण दिवस होऊ शकणार नाही. तसेच रविवारचा (दि. 14) सकाळचा पाणीपुरवठा कमी दाबाने होईल. नागरिकांनी याची नोंद घेत मनपास सहकार्य करावे, असे आवाहन महापालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
अघोषित पाणी कपातीची नाशिककरांमध्ये चर्चा
नाशिक जिल्ह्याच्या धरणातील पाण्यासाठ्यात 31 जुलैपर्यंत पुरेल इतकाच पाणीसाठा उपलब्ध आहे. आणखी वीस दिवस कसेबसे पाणी शहराला पुरवले जाऊ शकते. वरुणराजाने पाठ फिरवल्यास शहराला भीषण पाणीबाणीला सामोरे जावे लागू शकते.त्यामुळे नागरिकांवर पाणी कपातीची टांगती तलवार कायम आहे. त्यामुळे देखभाल दुरुस्ती कामाच्या निमित्ताने अघोषित पाणी कपात होत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरु आहे.
जिल्ह्यात फळबागा आणि भाजीपाल्याला फटका
दरम्यान, नाशिक जिल्ह्यात पाऊस वेळेत नसल्यामुळे आणि पावसाळ्यात उन्हाचा पारा वाढत असल्याने शेती पिकांना मोठा फटका बसत आहे. खराब वातावरणामुळं फळबागांना आणि भाजीपाल्याला रोगराईचा फटका बसत आहे. सध्या पिकांचं उत्पादन कमी झाल्यामुळं दरात वाढ होताना दिसत आहे. टोमॅटोची दर प्रति किलो 80 ते 100 रुपये किलो दराने वाढला आहे.
आणखी वाचा