(Source: ECI/ABP News/ABP Majha)
'गॅरेजवाले, ड्रायव्हर, नववीपर्यंत शिकलेले, 19 वर्षांचे तरुणही शिक्षक मतदार'; विवेक कोल्हेंचा किशोर दराडेंवर गंभीर आरोप
Nashik Teachers Constituency Elections 2024 : महायुतीचे उमेदवार किशोर दराडे यांच्यावर अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे यांनी गंभीर आरोप केला आहे.
Nashik Teachers Constituency Elections 2024 : नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचा प्रचार शेवटच्या टप्प्यात आल्याने आता आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे. महायुतीचे उमेदवार किशोर दराडे (Kishor Darade) यांच्यावर अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे (Vivek Kolhe) यांनी गंभीर आरोप केला आहे. किशोर दराडे यांच्या संस्थेच्या माध्यमातून बोगस मतदारांची नोंदणी झाल्याचा आरोप विवेक कोल्हे यांनी केला आहे.
नाशिक शिक्षक मतदारसंघ निवडणुकीतील अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे यांनी पत्रकार परिषद घेत शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नाकडे लक्ष वेधत मुद्दे मांडले. कोल्हे म्हणाले की, दराडे यांच्या संस्थेतील विद्यार्थ्यांसाठी येणारी शिष्यवृत्तीत आर्थिक घोटाळा झाला असून, विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीपासून वंचित ठेवण्यात आले. त्यामुळे या प्रकरणाची शासनाने चौकशी करावी.
हजारोंच्या संख्येने बोगस शिक्षकांची नावे मतदार यादीत
नाशिक शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत हजारोंच्या संख्येत मतदार म्हणून बोगस शिक्षकांची नावे मतदार यादीत समाविष्ट करण्यात आली असून, धक्कादायक म्हणजे, ड्रायव्हर, कापड दुकानात काम करणारे कर्मचारी, गॅरेजवरील कर्मचारी, नववी शिक्षण असलेले, अवघे १९ वर्षे वय असलेले शिक्षक मतदार असल्याचा दावा कोल्हे यांनी केला. एका बोगस शिक्षकाचे शिक्षण नववी असताना त्यालादेखील शिक्षक दाखवल्याचा खळबळजनक आरोप विवेक कोल्हे यांनी केला.
भाजपाने उमेदवारी द्यावी याबाबत कधीही मागणी केली नाही
शिक्षकांचे अनेक वर्षांपासूनचे प्रलंबित प्रश्न असून, आतापर्यंत त्याकडे कोणीही लक्ष दिले नाही. मात्र, आपण हे सर्व प्रश्न मार्गी लावणार आहोत. जुनी पेन्शनसारखे अनेक महत्त्वाचे शिक्षकांचे प्रश्न आहेत. ते अद्यापपर्यंत सुटलेले नाहीत. ते आपण सोडवणार आहोत. शिक्षकांनादेखील समजले आहे, की आपल्यासाठी कोण काम करू शकेल. भाजपाने उमेदवारी द्यावी याबाबत आपण कधीही मागणी केली नसल्याचे त्यांनी म्हटले.
धाडीमागे भाजपचा हात? विवेक कोल्हे म्हणाले...
सर्वच जिल्ह्यामध्ये शिक्षक मतदारांमधून चांगला प्रतिसाद मिळत असून, शिक्षक संघटनांचादेखील आपल्यालाच पाठिंबा असल्याचा दावा कोल्हे यांनी केला. दरम्यान, काही दिवसांपूर्वी कोल्हेंच्या काही संस्थांवर अचानक तपासणी करण्यात आली. यामागे भाजप आहे का, असा प्रश्न त्यांना विचारला असता, त्यांनी याचा इन्कार करत याचा राजकारणाशी काही संबंध नव्हता. तो एक तपासाचा भाग असल्याचे म्हटले.
आणखी वाचा