Amit Shah Nashik Visit : केंद्रीय गृह आणि सहकारमंत्री अमित शाह नाशिक दौऱ्यावर, 'हे' आहे कारण
Nashik News : केंद्रीय मंत्री अमित शाह, नितीन गडकरी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह प्रमुख नेते नाशिक दौऱ्यावर येणार आहेत.
Amit Shah Nashik Visit नाशिक : गेल्या महिन्याभरापासून नाशिकमध्ये राजकीय नेत्यांची मांदियाळी दिसून येत आहे. नाशिक राजकीय महत्व अलीकडे वाढले आहे. 12 जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) नाशिक दौऱ्यावर होते. नाशिकमध्ये त्यांचा जंगी रोड शो झाला. याचा फायदा भाजपला आगामी लोकसभा निवडणुकीसाठी होणार असल्याची चर्चा आहे. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासह राज्यातील आणि केंद्रातील प्रमुख मंत्र्यांनी याच महिन्यात नाशिकचा दौरा केला.
22 जानेवारीला अयोध्येत राम मंदिराचा लोकार्पण सोहळा पार पडला. या सोहळ्याला न जाता ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी नाशिकला हजेरी लावली. नाशिकला काळाराम मंदिरात त्यांनी दर्शन घेतले. तसेच शिवसेना ठाकरे गटाचे राज्यव्यापी अधिवेशन आणि उद्धव ठाकरेंची जाहीर सभा नाशकात पार पडली. त्यानंतर आता केंद्रीय मंत्री अमित शाह , नितीन गडकरी, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह काही प्रमुख नेते नाशिक दौऱ्यावर येणार आहेत.
नाशकात दोन दिवसीय सहकार परिषद
नाशिक जिल्हा नागरी सहकारी बँक्स असोसिएशनने दि. 27 व 28 जानेवारीला महाराष्ट्र राज्य नागरी सहकारी बँक्स परिषदेचे आयोजन केले आहे. कर्मवीर दादासाहेब गायकवाड सभागृह, भाभानगर, मुंबईनाका येथे ही परिषद होणार आहे. या परिषदेला केंद्रीय मंत्री अमित शाह आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणार आहेत.
अमित शाह यांच्या हस्ते उद्घाटन, एकनाथ शिंदे अध्यक्षस्थानी
सहकार परिषदेत महाराष्ट्रातील नागरी सहकारी बँकांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक, मुख्य कार्यकारी अधिकारी, सरव्यवस्थापक, वरिष्ठ अधिकारी सहभागी होणार आहेत. 27 जानेवारीला सकाळी 10 वाजता परिषदेचे उद्घाटन केंद्रीय गृह व सहकारमंत्री अमित शाह यांच्या हस्ते होईल. अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राहतील.
समारोपाला नितीन गडकरींची उपस्थिती
29 जानेवारीला परिषदेचा समारोप केंद्रीय रस्ते, वाहतूक आणि महामार्गमंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत होईल. परिषदेनिमित्त बँकिंग क्षेत्रातील आव्हाने व व्यवस्थापनातील नवनवीन बदलांचा वेध घेणारे सहा परिसंवाद होणार आहेत. त्यात सहकार व बैंकिंग क्षेत्रातील तज्ज्ञ विचार मांडणार आहेत. सहकार परिषदेनिमित्त भारतातील विविध माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्या तसेच बँकिंग क्षेत्रातील आधुनिकीकरणासाठी लागणान्या उत्पादनांचे स्टॉल्स असणार आहेत.
दरम्यान, परिषदेस उपस्थित राहण्याचे आवाहन स्वागताध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार, खा. हेमंत गोडसे, सहकार परिषदेचे निमंत्रक विश्वास ठाकूर, परिषदेचे अध्यक्ष अजय ब्रोचा, जिल्हा नागरी सहकारी बँक्स असोसिशनचे कार्याध्यक्ष महेंद्र बोरा, उपाध्यक्ष राजेश भांडगे, संचालक डॉ. शशीताई अहिरे, दत्ता गायकवाड, हेमंत धात्रक आदींनी केले आहे.
आणखी वाचा
Sudhakar Badgujar : ठाकरे गटाचे महानगरप्रमुख सुधाकर बडगुजरांना मोठा दिलासा, अटकपूर्व जामीन मंजूर