Nashik Crime : नाशिक शहरात गुन्हेगारीचा कळस; नाश्ता केला, पैसे मागितले तर स्वीट मालकाला मारहाण
Nashik Crime : फुकटात कोल्ड्रिंक आणि नाश्ता दिला नाही म्हणून सहा सात जणांच्या टोळक्याने स्वीट मालकाला मारहाण केली आहे.
Nashik Crime : नाशिक (Nashik) शहरात सध्या गुन्हेगारीने कळस गाठला असून खून, गोळीबार, प्राणघातक हल्ले, लूटमारीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. अशातच फुकटात कोल्ड्रिंक आणि नाश्ता दिला नाही म्हणून सहा सात जणांच्या टोळक्याने मिठाई व्यावसायिकास लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना सातपूर परिसरात समोर आली आहे. सातपूर (Satpur) परिसरातील अंबिका स्वीट्समध्ये रविवारी सायंकाळी घडलेला हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे.
गेल्या काही दिवसांपासून नाशिक शहरात भाईगिरी (Crime) चांगलीच फोफावली असून भाईगिरी करणाऱ्या टोळ्या वाढू लागल्या आहेत. या टोळक्यांकडून कधी व्यावसायिकाला मारहाण तर कधी भर रस्त्यामध्ये कोयते घेऊन दहशत माजवण्याचा प्रकार घडत आहेत. हे टोळके सर्वसामान्य नागरिकांसह पोलिसांसाठी मोठी डोकेदुखी ठरत आहेत. आज नाशिकमध्ये एका मिठाई व्यावसायिकाला मारहाण (Beaten) करण्यात आल्याचा प्रकार सातपूर येथील अंबिका स्वीट्स येथे घडला आहे. फ्री मध्ये कोल्ड्रिंक आणि नाश्ता दिला नाही, म्हणून पाच ते सहा जणांच्या टोळक्याने व्यावसायिकासह तिथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला बेदम मारहाण केली आहे. हा मारहाणीचा व्हिडिओ या स्वीट होममधील सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे.
सातपूरच्या महादेव नगर येथील अंबिका स्वीट्स येथे पाच ते सहा जणांचे टोळके नाश्ता करण्यासाठी आलेले होते. नाश्ता केल्यानंतर पैसे देण्यावरून वाद झाला. फ्रीमध्ये कोल्ड्रिंक आणि नाश्ता दिला नाही, म्हणून थेट व्यावसायिक तसेच त्या ठिकाणी काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला बेदम मारहाणी करण्यात आलेली आहे. या मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाला असून व्हिडिओमध्ये दहशत वाजवणारे टोळके व्यावसायिकला मारहाण करण्याबरोबर स्वीटमधील साहित्य अस्ताव्यस्त करताना दिसत आहे. घटनेची माहिती सातपूर पोलिसांना कळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी दाखल होत अवघ्या काही तासांतच संशयितांना ताब्यात घेतले आहे.
काही तासांत संशयित ताब्यात
दरम्यान अशा प्रकारे भाईगिरी करत दहशत माजवण्याचा प्रयत्न करणारे टोळके आपल्या आजूबाजूच्या परिसरात आढळल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन सातपूर पोलिसांनी केले आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंकज भालेराव यांच्या मार्गदर्शनाखाली अवघ्या काही तासातच या संशयित टोळक्याला जेरबंद करण्यात आलेले असून पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब वाघ, पोलीस अंमलदार अनंता महाले, संभाजी जाधव, रोहिदास कनोजे यांच्या टीमने तातडीने ही कारवाई केली. दरम्यान काही दिवसांपूर्वी सातपूर येथील अभिषेक बेकरी या ठिकाणी भर दिवसा केक फ्री दिला नाही, म्हणून कोयता काढत व्यावसायिकाला मारहाण करण्यात आल्याची घटना घडली होती. यावेळी पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेत सातपुर परिसरातून संशयितांची धिंड काढली होती.