Sudhakar Badgujar : मोठी बातमी : सुधाकर बडगुजरांच्या भाजप प्रवेशाला लागणार मुहूर्त, वरिष्ठांच्या सूचनेनंतर स्थानिक पदाधिकाऱ्यांचा विरोध मावळला
Sudhakar Badgujar : शिवसेना ठाकरे गटातून हकालपट्टी केल्यानंतर सुधाकर बडगुजर भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगल्या आहेत.

Sudhakar Badgujar : सुधाकर बडगुजर (Sudhakar Badgujar) यांच्यावर शिवसेना ठाकरे गटाने (Shiv Sena UBT) शिस्तभंगाची कारवाई करत त्यांची पक्षातून हकालपट्टी केल्याने नाशिकच्या राजकारणात (Nashik Politics) मोठी खळबळ उडाली. त्यानंतर त्यांना भाजपने (BJP) आपल्या पक्षात येण्यासाठी खुली ऑफर दिली आहे. मात्र, स्थानिक पदाधिकाऱ्यांनी सुधाकर बडगुजर यांच्या भाजप प्रवेशाला कडाडून विरोध केला होता. आता स्थानिक पदाधिकाऱ्यांचा विरोध मावळला असून सुधाकर बडगुजर यांच्या भाजप प्रवेशाला मुहूर्त लागणार आहे. स्थानिक पातळीवर आरोप-प्रत्यारोप होत असतात. पण, पक्ष वाढीसाठी प्रदेश पातळीवर निर्णय होतो. वरिष्ठ जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल, असे स्पष्टीकरण भाजपचे शहराध्यक्ष सुनील केदार (Sunil Kedar) यांनी दिले आहे.
वरिष्ठ जो निर्णय घेतील तो निर्णय आम्हाला मान्य
भाजपचे शहराध्यक्ष सुनील केदार म्हणाले की, कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी काल जळगावला बैठक बोलावली होती. या बैठकीत त्यांनी सांगितले की, आपण जरी त्यांना पक्षात घेतले नाही तरी ते इतर पक्षात जाणारच आहेत. त्यामुळे त्यांना आपण प्रवेश दिला पाहिजे, असे त्यांनी आम्हाला सूचित केलेले आहे. वरिष्ठ जो निर्णय घेतील तो निर्णय आम्हाला मान्य आहे. स्थानिकांचा विरोध साहजिकच आहे. निवडणुकीत एकमेकांविरोधात लढलेले आहेत. एकमेकांविरुद्ध आरोप केलेले आहेत. त्यामुळे स्थानिक नाराज असतात. पण, वरिष्ठांनी आम्हाला शब्द दिला आहे की, स्थानिकांच्या कुठल्याही हक्कावर अडसर येणार नाही. त्यामुळे ते स्वतःच्या इच्छेने प्रवेश करत असतील तर आपल्याला त्यांना प्रवेश देणार आहे, असे त्यांनी सांगितले.
गणेश गीतेंच्या भाजप प्रवेशालाही लागणार मुहूर्त
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे गणेश गीते यांची देखील भाजपमध्ये घरवापसी होणार असल्याची चर्चा रंगली आहे. विधानसभा निवडणुकीसाठी नाशिक पूर्व मतदारसंघातून निवडणूक लढण्यासाठी गणेश गीते इच्छुक होते. मात्र, भाजपने आमदार राहुल ढिकले यांना पुन्हा एकदा उमेदवारी दिल्याने गणेश गीते यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली होती. त्यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून विधानसभेची निवडणूक लढवली होती. गणेश गीते यांचा राहुल ढिकले यांनी पराभव केला. त्यानंतर गणेश गीते भाजपमध्ये घरवापसी करणार असल्याची चर्चा रंगली आहे. आता सुनील केदार यांच्या वक्तव्यामुळे गणेश गीते यांच्या भाजप प्रवेशाला देखील मुहूर्त लागणार आहे.
आणखी वाचा























