Aditya Thackeray : 'हा 31 वर्षाचा तरुण तुम्हा सगळ्यांना नडणार अन् भिडणार पण... नाशिकमध्ये आदित्य ठाकरेंचा इशारा
Aditya Thackeray : नाशिकमध्ये आदित्य ठाकरे यांनी शिंदे गटाच्या चाळीस आमदारांना आगामी निवडणुकांसंदर्भात इशारा दिला आहे.
Aditya Thackeray : चाळीस आमदारांमधून एकही निवडणुकीत निवडून येणार नाही. हा 31 वर्षाचा तरुण तुम्हा सगळ्यांना नडणार आहे. चाळीस जणांना घरी बसवायचं म्हणजे बसवायचं, एकटा जरी राहिलो तरीही चाळीस जणांना घरी बसवणारच, असा इशारा यावेळी आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी दिला.
शिवसेना (Shivsena) युवा नेते आदित्य ठाकरे नाशिक (Nashik) दौऱ्यावर असून आज शहरातील सातपूर परिसरात पदाधिकारी मेळावा घेण्यात आला. यावेळी ते बोलत होते. आदित्य ठाकरे यांनी यावेळी पुन्हा एकदा शिंदे गटाच्या चाळीस आमदारांवर जोरदार निशाणा साधला. ज्यावेळी हे चाळीस आमदार गुवाहाटीला जाऊन आले, त्यानंतर शपथविधी झाला. त्या दिवसांपासून ठरविलं आहे की, आता माझ्यासमोर या, मी एकटाच लढतो, गुवाहाटीला गेलेल्या चाळीस आमदार घरी बसल्याशिवाय राहणार नाही, चाळीस जणांना घरी बसवायचं म्हणजे बसवायचं. हा 31 वर्षाचा तरुण तुम्हा सगळ्यांना नडणार आहे. एकटा जरी राहिलो तरीही चाळीस जणांना घरी बसवणारच, असा इशारा यावेळी आदित्य ठाकरे यांनी दिला.
ते पुढे म्हणाले की, शपथविधीनंतर एक गद्दार निरोप पाठवत होता कि उद्धव ठाकरे साहेब एकटे कशाला लढत आहात, कोणासाठी लढत आहात, आमच्या सोबत या, लाल दिवा आहे, मंत्रिपद आहे, मी बोललो 'मेरे पास जनता आहे'. महाराष्ट्राची माती आहे, महाराष्ट्राच्या मातीसोबत गद्दारी नाही. त्यामुळे आगामी काळात महाराष्ट्राच्या प्रत्येक माणसाला शिवसेना सांगायची आहे. मी शिवसैनिक आहे, शिवसैनिक म्हणूनच लढतो, जनता म्हणून आपण एकत्र येऊ, निवडणूक व्हायच्या तेव्हा होतील, पुन्हा एकदा स्वच्छ राजकारण आणायचं आहे. चाळीस गद्दारांना निवडून आणण्यासाठी आधीच्या निवडणुकीत आपण आशीर्वाद दिला प्रेम दिल, ठाकरे कुटूंबियांना ज्यांना आपलंस मानलं, तुम्ही सगळे देखील ठाकरे आहात, तुम्ही सगळ्यांनी प्रेम दिल.. पण आता नाही... त्या आमदारांच्या राजकारणावर बुलडोजर चालवावा लागेल, असा इशारा आदित्य ठाकरे यांनी जाता जाता दिला.
महाराष्ट्राला तोडण्याचे राजकारण सुरु
महाराष्ट्राला तोडण्याचे राजकारण सुरु असून महाराष्ट्राला दिल्लीसमोर झुकवण्याचे काम सुरू आहे. मुख्यमंत्र्यांचे दोन दिवसांनी लोकेशन दिल्ली असतंय, प्रत्येक आठवड्यात दोन दिवसांनी दिल्लीला जात आहेत. मग गल्लोगलीत कोण फिरणार? तुमच्या शहरात एक नवा उद्योग आला आहे का? नवीन संधी काही आली आहे का? त्यामुळे तिकीट तिकीट बाजूला ठेवून आपल्या महाराष्ट्रासाठी एकत्र यायला हवं, कारण धोका तुम्हा आम्हाला नाही तर महाराष्ट्राला आहे. राज्यात फोडाफोडीच राजकारण असून राजकीय नेते फोडाफोडीमध्ये व्यस्त आहेत. शेतकऱ्यांचा, तरुणांचा आवाज ऐकणारे कोणी नाही, महाराष्ट्राला पुढे येऊ द्यायचं नाही, असा घणाघाती टीका यावेळी आदित्य ठाकरे यांनी केली.