Rahul Gandhi : राहुल गांधी त्र्यंबकराजाच्या चरणी लीन, आता थेट गाठणार मुंबई
Bharat Jodo Nyay Yatra : काँग्रेस नेते राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा आज नाशिकमध्ये दाखल झाली. राहुल गांधीनी त्र्यंबकेश्वरला जात महादेवाचे दर्शन घेतले. उद्या ते मुंबईकडे रवाना होतील.
Rahul Gandhi : काँग्रेस नेते राहुल गांधींची (Rahul Gandhi) भारत जोडो न्याय यात्रा (Bharat Jodo Nyay Yatra) आज नाशिकमध्ये दाखल झाली. त्यानंतर नाशिकमध्ये त्यांचा जंगी रोड शो आयोजित करण्यात आला. शालिमार परिसरात जाहीर सभा आटोपून राहुल गांधी त्र्यंबकेश्वरकडे (Trimbakeshwar) रवाना झाले. त्र्यंबकेश्वरला महादेव मंदिरात (Mahadev Temple) राहुल गांधींच्या हस्ते महापूजा आणि आरती करण्यात आली.
राहुल गांधी नाशिकमध्ये दाखल होताच त्यांचे नाशिक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांकडून जोरदार स्वागत करण्यात आले. नाशिक येथे झालेल्या रोड शो ला देखील नाशिककरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. त्यानंतर राहुल गांधी त्र्यंबकेश्वर येथे दाखल झाले. यावेळी राहुल गांधींना बघण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
राहुल गांधी त्र्यंबकराजाच्या चरणी लीन
राहुल गांधींनी त्र्यंबकराजाचे दर्शन घेऊन प्रार्थना केली. यावेळी पौरोहित्य विश्वस्त तथा पुरोहित संघाचे अध्यक्ष मनोज थेटे, ललीत लोहगावकर आदींनी केले. विश्वस्त मंडळाचे चेअरमन न्या. नितीन जीवने, विश्वस्त कैलास घुले, पुरूषोत्तम कडलग, स्वप्नील शेलार, रूपाली भुतडा यांनी त्यांचे स्वागत केले. मंदिराचे राहुल गांधींना माहिती देण्यात आली. मनोज थेटे हे गांधी यांचे वंश परंपरागत तीर्थ पुरोहित आहेत त्यांनी राहुल गांधी यांना वंशावळ दाखवली. त्यानंतर ते पुढील नियोजित यात्रेसाठी मोखाडा येथे रवाना झाले. उद्या राहुल गांधी मुंबईकडे रवाना होणार आहेत.
राहुल गांधींची मुंबईत भव्य सभा
17 मार्च रोजी राहुल गांधींची मुंबईतील शिवाजी पार्कवर भव्य सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेला महाविकास आघाडीतील प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत. शिवसेना ठाकरे गटाचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे देखील सभेला उपस्थित असतील. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीकडून मुंबईत जोरदार शक्ती प्रदर्शन केले जाणार आहे. या सभेत राहुल गांधी काय बोलणार? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
राहुल गांधींचे शेतकऱ्यांना आश्वासन
चांदवड येथील सभेतून राहुल गांधींनी मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. ते म्हणाले की भारतात महागाई, बेरोजगारीची मोठी समस्या आहे. मोदी सरकारकडून श्रीमंतांची कर्ज माफ केली जात आहेत. मात्र गरिबांची कर्ज माफ होत नाहीत. 22 उद्योजकांचे 16 लाख कोटींचे कर्ज मोदींनी माफ केले. देशातील 70 कोटी लोकांकडे जितकी संपत्ती आहे. तितकी संपत्ती या उद्योगपतींकडे असल्याचा गंभीर आरोप राहुल गांधीनी केला आहे. शेतकरी जेव्हा कांदा विकण्यासाठी आणतो तेव्हा आयात-निर्यात धोरण बदलून शेतकऱ्याचे उत्पन्न घटविले जाते. आमचे सरकार आल्यानंतर आयात-निर्यात धोरणापासून शेतकऱ्यांचे संरक्षण करणार असल्याचे आश्वासन त्यांनी यावेळी शेतकऱ्यांना दिले.
आणखी वाचा