Prakash Ambedkar : प्रकाश आंबेडकरांची नाशिकमध्ये 'तिरकी चाल', भुजबळांसह जे पी गावितांना मोठी राजकीय ऑफर
Prakash Ambedkar : वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी नाशिकमध्ये तिरकी चाल खेळली आहे. मंत्री छगन भुजबळ आणि माजी आमदार जे पी गावित यांना त्यांनी मोठी राजकीय ऑफर दिली आहे.
नाशिक : वंचित बहुजन आघाडीचे (Vanchit Bahujan Aghadi) अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) आज नाशिक (Nashik) दौऱ्यावर आले होते. नाशिकमध्ये त्यांनी पेसा अंतर्गत नोकर भरती केली जावी, यासाठी आंदोलनाला बसलेल्या माजी आमदार जे पी गावित (J P Gavit) यांची भेट घेतली. जे पी गावित यांच्या आंदोलनाला त्यांनी पाठींबा दर्शवला. तसेच आगामी विधानसभा निवडणुकीच्या (Vidhan Sabha Election 2024) पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकरांनी नाशिकमध्ये तिरकी चाल खेळली आहे. त्यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) आणि माजी आमदार जे पी गावित यांना मोठी राजकीय ऑफर दिली.
पेसा अंतर्गत नोकर भरती केली जावी, या मागणीसाठी माकपचे माजी आमदार जे पी गावित तीन दिवसांपासून उपोषणाला बसले आहेत. त्यातच नाशिक दौऱ्यावर आलेल्या प्रकाश आंबेडकर यांनी माजी आमदार जे पी गावीत यांची भेट घेतली. नाशिकमध्ये आंदोलन न करता थेट मुख्यमंत्री कार्यालयावर लक्ष करावे, असा सल्लाही आंबेडकरांनी गावितांना दिला.
तिसऱ्या आघडीसोबत या, आंबेडकरांची गावितांना ऑफर
तसेच जे पी गावितांना चर्चा करतानाच राजकारणात आमच्या सोबत, तिसऱ्या आघडीसोबत या अशी थेट ऑफर आंबेडकर यांनी गावीत यांना दिली. त्यामुळे जे पी गावीत यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आलेल्या आंबेडकर यांच्या ऑफरचीच चर्चा आंदोलन स्थळी झाली. यावर प्रतिक्रिया देताना प्रकाश आंबेडकर यांनी जे पी गावीत यांच्या बाबतीत मिश्किल टिपणी देखील केली. त्यांचं लग्न आधीच काँग्रेस सोबत झालं आहे. आता त्यांचा काडीमोड होत नाही, तोपर्यंत काही नाही अशी प्रतिक्रिया माध्यमांना दिली. कोणासोबत जायचा हा पक्षाच्या वरिष्ठ पातळीवर निर्णय घेतला जाईल, असे सांगत आंबेडकर यांच्या ऑफरवर गावित यांनी फारसे भाष्य करणे टाळले.
छगन भुजबळ यांनी आमच्या सोबत यावं : प्रकाश आंबेडकर
तर प्रकाश आंबेडकर यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री आणि ओबीसी नेते छगन भुजबळ यांना मोठी ऑफर दिली आहे. छगन भुजबळ हेच १०० टक्के ओबीसी नेते आहेत. त्यांच्या पक्षात ओबीसींवर बोलले जाते का? याबाबत त्यांनी सांगावं, असे म्हणत छगन भुजबळ यांनी आमच्या सोबत यावं, त्यांना मी खुली ऑफर देत आहे, असे वक्तव्य प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे. आता प्रकाश आंबेडकरांच्या वक्तव्यावर छगन भुजबळ काय प्रतिक्रिया देणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
आणखी वाचा