(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Parambir Singh : परमबीर सिंहांच्या अडचणीत वाढ? निकटवर्तीय संजय पुनुमिया यांच्याविरोधात सिन्नरमध्ये गुन्हा दाखल
Parambir Singh : परमबीर सिंह यांचे निकटवर्तीय संजय पुनुमिया यांच्याविरोधात सिन्नरमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बनावट कागदपत्रं सादर करून सिन्नरमध्ये जमीन खरेदी केल्याचा गुन्हा दाखल.
Parambir Singh Case : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. सिन्नरमध्ये बनावट कागदपत्रं सादर करून कोट्यवधींची जमीन खरेदी केल्याप्रकरणी परमबीर सिंह यांचे निकटवर्तीय संजय पुनुमिया यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. पुनुमिया यांनी समृद्धी महामार्गालगत जमिनी लाटल्याचा संशय आहे आणि या जमीन खरेदीशी परमबीर सिंह यांचा काही संबंध आहे का? याचा तपास पोलीस करणार आहेत. संजय पुनुमिया सध्या ठाणे पोलिसांच्या ताब्यात आहेत. सिन्नर पोलीस त्यांचा ताबा घेऊन जमीन खरेदी व्यवहारांची चौकशी करणार आहेत.
नाशकातील सिन्नर तालुक्यात काही वर्षांपूर्वी पुनुमिया यांनी जमिन खरेदी केल्याची माहिती मिळत आहे. तसेच जमिन खरेदी करताना त्यांनी शेतकरी असल्याचं भासवलं असून बनावट कागदपत्र त्यांनी सादर केले आहेत. त्यामुळे उपनिबंधक कार्यालयाला एक तक्रार दाखल झाली होती. या तक्रारीच्या आधारे संजय पुनुमिया यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नाशकातील सिन्नर पोलिसांमध्ये याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर सिन्नर पोलिसांचं एक पथक पाहणी करत आहे. तसेच या संपूर्ण प्रकरणात मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांचाही संबंध असू शकतो, असा संशय आहे. तसेच त्यांनी बनावट कागदपत्र कुठून तयार केली आणि या प्रकरणात त्यांच्यासोबत आणखी कोणाचा संबंध आहे, याचा तपास करण्यासाठी संजय पुनमिया यांचा ताबा ठाणे पोलिसांकडून नाशिक पोलिसांकडे दिला जाण्याची शक्यता आहे.
दरम्यान, मुंबईचे माजी पोलीस कमिश्नर परमबीर सिंह यांच्या लेटबॉम्बनंतर पोलीस दलात आणि राजकीय वर्तुळात खळबळ माजली होती. परमबीर सिंह यांनी आपल्या पत्रातून माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले होते. देशमुख यांनी सचिन वाझे यांना 100 कोटी वसुलीचं टार्गेट दिल्याचा आरोप सिंह यांनी केला होता. त्यानंतर याप्रकरणी अनेक आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. अशातच आता परमबीर सिंह यांच्या अडचणी आणखी वाढल्याचं दिसत आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :