नाशिक जिल्हा परिषदेच्या सीईओ आशिमा मित्तल अॅक्शन मोडवर, तीन जणांच्या निलंबनासह पाच कर्मचाऱ्यांवर कारवाई, नेमकं प्रकरण काय?
Nashik Zilla Parishad : जिल्हा परिषदेतील विविध विभागांतील आठ कर्मचाऱ्यांवर कारवाईचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी दिले आहेत. यामुळे नाशिक जिल्हा परिषदेत मोठी खळबळ उडाली आहे.
नाशिक : जिल्हा परिषदेतील (Zilla Parishad) विविध विभागांतील आठ कर्मचाऱ्यांवर कारवाईचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल (Ashima Mittal) यांनी दिले आहेत. कारवाई करण्यात आलेल्यांमध्ये ग्रामपंचायत विभागातील दोन, बांधकाम विभागातील दोन, शिक्षण विभागातील तीन तर आरोग्य विभागातील एका कर्मचाऱ्याचा समावेश आहे. विविध कारणांमुळे मागील काही दिवसांत कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. तीन कर्मचाऱ्यांचे थेट निलंबन करण्यात आले असून यामुळे नाशिक (Nashik News) जिल्हा परिषदेत मोठी खळबळ उडाली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, चांदवड तालुक्यातील वडनेर भैरव प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी यांच्या कामकाजाविषयी वारंवार तक्रारी होत होत्या. त्यांच्या कामकाजाची चौकशी करण्यासाठी अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी यांचे पथक पाठवले असता वैद्यकीय अधिकारी गैरहजर आढळले. कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया झालेले रुग्ण असताना त्यांची वैद्यकीय तपासणी झालेली नव्हती. तालुका आरोग्य अधिकारी व जिल्हा आरोग्य अधिकारी यांना न कळवता गैरहजर असल्याचे आढळले. त्यामुळे त्यांच्या संदर्भात चौकशी अहवाल मुख्य कार्यकारी अधिकारी यांना सादर करण्यात आला आहे.
शिक्षकांमध्ये हाणामारी, निलंबनाची कारवाई
दिंडोरी तालुक्यातील सहविचार सभेत दोन शिक्षकांमध्ये वाद होऊन हाणामारी करतानाची चित्रफीत समाजमाध्यमांवर व्हायरल झाली होती. यात एका शिक्षकाचे निलंबन करण्यात आले आहे. तर इगतपुरी तालुक्यातील वाडीवर्हे गावातील जिल्हा परिषद शाळेत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी भेट दिली होती. त्यावेळी शाळेत कुणीही हजर नव्हते. त्यामुळे मुख्याध्यापकावर कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत.
लेखा परीक्षण न केल्याने निलंबन
ग्रामपंचायत विभागातील प्रतिनियुक्तीने कार्यरत असलेले ग्रामसेवक बाबतीत तक्रार करण्यात आली होती. त्यानुषंगाने ग्रामसेवकाला कार्यमुक्त करण्याचे आदेश देण्यात आलेत तर दुसऱ्या एका प्रकरणात मालेगाव तालुक्यातील वळवाडी इथे कार्यरत असणाऱ्या ग्रामसेवकाने नागझरी आणि हाताणे ग्रामपंचायतचे दप्तर तपासणीसाठी दिले नाही. तसेच निमशेवाडी येथील लेखा परीक्षण केले नसल्याने निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
40 हजारांची लाच स्वीकारल्याने निलंबन
तर सुरगाणा पंचायत समिती येथील बांधकाम विभागाचे उपअभियंता यांना 40 हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केल्याने निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. तसेच बागलाण पंचायत समिती येथील उपअभियंता यांच्या कामकाजाबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे तक्रार प्राप्त झाली होती. यासंदर्भात संबंधित उपअभियंत्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. एकूण तीन जणांच्या निलंबनासह आठ जणांवर नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी कारवाई केली आहे.
आणखी वाचा
बायकोनं लावला नवऱ्याला एक कोटींचा चुना; कंपनीचं साहित्य, गाडी, सगळंच विकून टाकलं, कारण ठरलं....