Nashik News : एकीकडे राम मंदिर लोकार्पण सोहळ्याची धामधुम; दुसरीकडे नाशिकला ठाकरे गटाच्या महाअधिवेशनाची जंगी तयारी, राजकीय लाभ कुणाला?
Nashik News : अयोध्येतील राम मंदिर लोकार्पण सोहळ्याची धामधुम सुरु असतानाच नाशिकमध्ये शिवसेना उबाठा गटाकडून महाअधिवेशनाची जय्यत तयारी सुरु झाली आहे.
General convention of Thackeray group : अयोध्येतील राम मंदिर (Ram Mandir) लोकार्पण सोहळ्याची धामधुम सुरु असतानाच नाशिकमध्ये शिवसेना उबाठा गटाकडून (Shivsena UBT) महाअधिवेशनाची जय्यत तयारी सुरु झाली आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना अजूनही राम मंदिर लोकार्पण सोहळ्याचे निमंत्रण मिळाले नसल्याने ठाकरे गट आणि भाजपमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. दोन्ही पक्षातील याच संघर्षातून नाशिकमध्ये अधिवेशनाची तयारी सुरु झाली आहे. तसेच मुंबईत धडकणाऱ्या मराठा आंदोलकांच्या मोर्चाला ठाकरे गटाकडून पाठबळदेखील दिले जात आहे. याबाबत एबीपी माझाने स्पेशल रिपोर्ट केला आहे.
लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजायला सुरुवात झाली असतानाच अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अयोध्येत राम लल्ला विराजमान होत आहे. 22 जानेवारी 2023 ला राममंदिरात प्राण प्रतिष्ठा सोहळा होणार असून अवघ्या देशाचे लक्ष या सोहळ्याकडे लागलं आहे. हिंदुत्ववादी संघटना आणि भाजपकडून गल्ली बोळात विविध धार्मिक कार्यक्रम घेतले जात आहेत. नागरिकांना आपल्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न सुरु आहे. राम नामाचा जयजयकार करत अयोध्येयातून आलेल्या अक्षतांचीही मिरवणूक काढून घराघरात वाटल्या जाणार आहेत.
22, 23 जानेवारीला नाशिकमध्ये राज्यस्तरीय अधिवेशन (State level convention in Nashik)
या निमित्ताने भाजपच्या कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना जास्तीत जास्त नागरिकांच्या संपर्कात जाण्याचे नियोजन केले जात आहे. एकीकडे भाजपकडून चौकाचौकात राममय वातावरण तयार केले जात असतानाच शिवसेना उबाठा गटाकडून 22 आणि 23 जानेवारीला नाशिकमध्ये राज्यस्तरीय अधिवेशन घेतले जात आहे. या अधिवेशनाची जय्यत तयारी सुरु असून ठाकरे गटाच्या नेत्यांचे दौरे वाढले आहेत.
अधिवेशन ऐतिहासिक करणार
1994 ला शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली नाशिकमध्ये शिवसेनेचे अधिवेशन झाले होते. त्यानंतर राज्यात शिवसेना भाजप युतीचे सरकार आले होते. त्याच पार्श्वभूमीवर नाशिकमधील अधिवेशन ऐतिहासिक करण्याचा शिवसेना ठाकरे गटाचा प्रयत्न आहे. मात्र यावरूनही शिवसेना भाजपमध्ये आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे.
ठाकरे गट पालापाचोळ्यासारखा बाजूला होईल
देशभरात राम मंदिराचा उत्सव सुरु असताना शिवसेना त्यातही राजकारण करत आहे. आपल्या पक्षाकडे लक्ष आकर्षित करण्यासाठी त्याच काळात नाशिकमध्ये अधिवेशन घेत असल्याचा आरोप भाजपने केला. मात्र रामनामाच्या जयजकारात शिवसेना उबाठा गट पाला पाचोळ्यासारखा बाजूला होईल, असा इशारा भाजपचे राज्य प्रवक्ते प्रदीप पेशकार यांनी दिला आहे.
...म्हणून तारीख बदलली
भाजपच्या आरोपांना शिवसेने प्रत्युत्तर दिले आहे. बाबरी मशीद पतन झाली त्याची जबाबदारी शिवसेनाप्रमुखांनी घेतली होती. तेव्हा भाजपाचे लोक पळून गेले होते. राम मंदिर लोकार्पण सोहळ्याची तारीख सुरुवातीला 23 जानेवारी ठेवण्यात आली होती. मात्र बाळासाहेब ठाकरे यांची जयंती असल्याचे लक्षात आल्यानंतर तारीख बदलण्यात आल्याचा दावा ठाकरे गटाचे माजी जिल्हाप्रमुख दत्ता गायकवाड यांनी केला आहे.
मराठा आंदोलनाच्या नियोजनात ठाकरे गटाचा पुढाकार
एकीकडे नाशिकमध्ये शिवसेना राज्य अधिवेशन घेत असतानाच दुसरीकडे आरक्षणाच्या मागणीसाठी 20 जानेवारीला जरांगे पाटील यांच्यासह लाखो मराठा बांधव मुंबईत धडकणार आहेत. आंदोलनाच्या नियोजनातही ठाकरे गटाचे पदाधिकारी पुढाकार घेत असून सरकार विरोधात मुंबईत धडकणाऱ्या या वादळाला पाठबळ देत आहेत. त्यामुळे भाजप विरोधात दोन्ही बाजूने ठाकरे गटाचे सक्रिय असल्याचे दिसून येते.
राजकीय लाभ कुणाचा?
शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे याना राम मंदिर लोकार्पण सोहळ्याचे निमंत्रण अद्यापही मिळाले नसल्याने शिवसैनिकांना जिव्हारी लागला आहे. त्यामुळे शिवसैनिक जिद्दीने अधिवेशनाच्या तयारीत उतरले आहे. तर रामनामाच्या आधारे राजकारण करणाऱ्या भाजपने रामनामाचे वातावरण लोकसभा निवडणुकीपर्यंत टिकून राहण्यासाठी अॅक्शन प्लॅन तयार केला आहे. दोन्ही इव्हेंट निवडणुका लक्षात ठेवून आखण्यात आल्याने याचा राजकीय लाभ कोणत्या पक्षाला किती होतो हे लवकरच स्पष्ट होणार आहे.
आणखी वाचा