Nashik Sawarpada Bridge : 'माझा'ची बातमी, इम्पॅक्टची हमी; सावरपाडातील तास नदीवर पुन्हा उभारणार लोखंडी पूल, अधिकाऱ्यांकडून पाहणी
Nashik Sawarpada Bridge : नाशिकच्या सावरपाडातील तास नदीवर पुन्हा लोखंडी पूल उभारला जाणार आहे. एबीपी माझाच्या बातमीनंतर वाहून गेलेल्या पुलाच्या ठिकाणी अधिकाऱ्यांकडून पाहणी करण्यात आली.
Nashik Sawarpada Bridge : सावरपाड्यातील गावकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी. सावरपाडामधल्या तास नदीवर नवा लोखंडी पूल पुन्हा (Sawarpada Bridge) उभारला जाणार आहे. त्यामुळे सावरपाडातील आदिवासी नागरिकांचा जीवघेणा प्रवास थांबणार असून गावकऱ्यांना नदीवरुन सुरक्षितपणे प्रवास करता येणार आहे.
त्रंबकेश्वर तालुक्यातील सावरपाडामधील आदिवासी महिला, नागरिकांचा जीवघेणा प्रवास थांबणार आहे. आदित्य ठाकरे यांच्या पुढाकाराने उभारण्यात आलेला पूल पहिल्याच पावसात पुराच्या पाण्यात वाहून गेला होता. पण निकृष्ट कामामुळे पहिल्याच पावसात पूल वाहून गेल्याचं वास्तव एबीपी माझानं महाराष्ट्र समोर आणलं होतं. एकीकडे आदिवासी महिला द्रौपदी मुर्मू राष्ट्रपती म्हणून विराजमान होत असताना दुसरीकडे आदिवासी पाड्यावरील आदिवासींची ससेहोलपट सुरू होती. एबीपी माझाच्या वृत्ताची स्थानिक प्रशासनानं तात्काळ दखल घेतली असून पुल पुन्हा उभारला जाणार आहे. त्रंबकेश्वर प्रांताधिकारी तेजस चव्हाण, तहसीलदार दीपक गिरासे यांच्यासह अधिकारी आणि अभियंत्यांची टीम आदिवासी पाड्यावर दाखल झाली. पाड्यापर्यंत पोहोचण्यासाठी प्रशासनालाही अडीच किलोमीटरची पायपीट करावी लागली. नव्यानं उभारला जाणारा पुल आधीच्या पुलापेक्षा उंच टेकडीवर उभारला जाणार आहे. सावरपाड्यातील नागरिकांच्या समस्येवर यंदा कायमस्वरुपी तोडगा काढण्याचा प्रयत्न प्रशासन करणार आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी सावरपाड्यातील गावकऱ्यांचा तास नदीवरुन जीवघेण्या प्रवासाचं वृत्त एबीपी माझानं दाखवलं होतं. याची दखल घेत आदित्य ठाकरेंनी शिवसैनिकांना पूल बांधण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार पुलही बांधण्यात आला. पण पावसाळ्यात नदीला आलेल्या पुरात हा पूल वाहून गेला. त्यामुळे सावरपाड्यातील नागरिकांच्या नशीबी पुन्हा एकदा नदीवरुन जीवघेणा प्रवास आला. एबीपी माझाला पुन्हा पूल वाहू गेल्याची बातमी मिळाली आणि सावरपाड्यातील गावकऱ्यांचा हा संघर्ष एबीपी माझानं पुन्हा उभ्या महाराष्ट्र समोर मांडला होता. आता याची दखल घेण्यात आली असून पूल पुन्हा उभारला जाणार आहे.
याआधीही एबीपी माझानं मांडली होती व्यथा
नाशिकमधील त्र्यंबकेश्वरच्या खरशेत ग्रामपंचायतीच्या हद्दीतील सावरपाडा मधील आदिवासी महिलांचा पाण्यासाठीचा जीवघेणा प्रवास, लहान मुलांचा थरकाप उडविणारा संघर्ष यापूर्वीही एबीपी माझानं उभ्या महाराष्ट्र समोर मांडला होता. या वृत्राची दखल तत्कालीन पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी घेतली होती. त्यांनी सावरपाडामध्ये जाऊन उपाययोजना करण्याच्या सूचना शिवसैनिकांना दिल्या होत्या. त्यानंतर नाशिक आणि मुंबईच्या शिवसैनिकांकडून आदेशाची अंमलबजावणी करत अवघ्या दोन दिवसांत तास नदीवर 30 बाय 4 फुटांचा लोखंडी पूल बसविण्याचं काम सुरू झालं होतं. पुलामुळं स्थानिकांना मोठा दिलासा मिळाला होता. स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष झाली तरीही सावरपाड्यात नदी ओलांडण्यासाठी पूल नव्हता. पिढ्यान पिढ्या जीवघेणी कसरत सुरू होती ती समस्या आदित्य ठाकरेंमुळे दूर झाली होती.