Nashik Police : नाशिक पोलिसांच्या कर्तव्याला सलाम! तब्बल तीन कोटींचा मुद्देमाल मालकांना केला परत
Nashik Police : नाशिक पोलिसांनी तब्बल तीन कोटींहून अधिक रुपयांचा हस्तगत केलेला मुद्देमाल मूळ मालकांना परत केला आहे. पोलीस मुख्यालयातील भिष्मराज सभागृहात हा कार्यक्रम पार पडला.
Nashik Police नाशिक : विविध गुन्ह्यात हस्तगत केलेला तब्बल तीन कोटींहून अधिक रुपयांचा मुद्देमाल नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक (Nashik Police Commissioner Sandip Karnik) यांच्या मार्गदर्शनाखाली मूळ मालकांना परत करण्यात आला आहे. रेझिंग डेच्या दिवशी पोलीस मुख्यालयातील भिष्मराज सभागृहात हा कार्यक्रम पार पडला.
पोलीस आयुक्त संदिप कर्णिक यांनी नाशिक पोलीस (Nashik Police) आयुक्तालय अंतर्गत असलेल्या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत घडलेले मालमत्ते विषयक गुन्हे उघडकीस आणण्याच्या अनुषंगाने पोलिसांना सूचना दिल्या होत्या. त्यानुसार गेल्या वर्षभरात दाखल मालमत्ते विषयक गुन्हे उघडकीस आणण्याकरीता सर्व पोलीस ठाण्यांचे तसेच गुन्हेशाखा युनिट १, २ व मध्यवर्ती गुन्हेशाखेचे पोलीस (Police) अधिकारी व अंमलदार यांनी अथक परिश्रम घेतले. पोलिसांनी गुन्हे उघडकीस आणून त्यातील चोरलेला मुद्देमाल हस्तगत केला होता. तो मुद्देमाल त्यांच्या मूळ मालकांना सुपूर्द करण्यात आला.
3 कोटी 66 लाख 697 रुपयांचा मुद्देमाल मालकांकडे सुपूर्द
त्यामध्ये 35 लाख 71 हजार 997 रुपये किंमतीचे सोन्याचांदीचे दागिने, 15 लाख 95 हजार किंमतीच्या मोटार सायकली, 58 लाख 5 हजार रुपये किंमतीचे मोटार वाहन, 3 लाख 67 हजार 500 रुपये किंमतीचे मोबाईल फोन,2 कोटी 53 लाख 31 हजार 200 रुपये किंमतीची रोख रक्कम, असा एकूण 3 कोटी 66 लाख 70 हजार 697 रुपये किंमतीचा मुद्देमाल मूळ मालकांना परत देण्यात आला.
याआधी 9 कोटींचा मुद्देमाल दिला परत
यापूर्वी देखील नाशिक पोलीस आयुक्तालय (Nashik Police Commissionerate) हद्दीतील मालाविरुध्दचे गुन्हे उघडकीस आणून त्यातील जप्त मुद्देमाल आठ वेळा एकूण 9 कोटी 14 लाख 1 हजार 399 रुपये किंमतीचा मुद्देमाल मालकांना परत करण्यात आलेला आहे.
दरम्यान, उपस्थितीत फिर्यादींपैकी दर्शना अढावु, स्नेहल येलमल्ले, मंगेश काजे, सुनिल यादव, नितीन गवांदे, बापु सुर्यवंशी, कैलास वाघ, पवण शर्मा, यांनी त्यांचे मनोगत व्यक्त करून पोलीस खात्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली. उपायुक्त गुन्हे प्रशांत बच्छाव, उपायुक्त परिमंडळ २ मोनिका राउत यांनी आपले मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन उपनिरीक्षक धनराज पाटील यांनी केले. प्रास्ताविक वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हेशाखा युनिट १ विजय ढमाळ यांनी तर आभार सहायक आयुक्त गुन्हे डॉ. सिताराम कोल्हे यांनी मानले.
इतर महत्वाच्या बातम्या