(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nashik Rain Update : अवकाळी पुन्हा बरसला, स्वप्नांचा चिखल; नाशिक जिल्ह्यातील शेतकरी मेटाकुटीला
Nashik Rain Update : नाशिक शहर (Nashik) आणि जिल्ह्यात दोन दिवसांपासून (Nashik District) वातावरण बदल होऊन अवकाळी पाऊस बरसतो आहे.
Nashik Rain Update : नाशिक शहरासह जिल्ह्यात पुन्हा एकदा अवकाळीने कहर केला (Unseasonal Rain) असून जिल्ह्यातील अनेक भागात विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाने पुन्हा एकदा हजेरी लावली. यामुळे बळीराजा पुन्हा एकदा संकटात सापडला आहे.
नाशिक शहर (Nashik) आणि जिल्ह्यात दोन दिवसांपासून (Nashik District) वातावरण बदल होऊन अवकाळी पाऊस बरसतो आहे. काल सायंकाळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचे आगमन झाल्याने शेतकऱ्यांची तारांबळ उडाली. यामुळे अनेक भागात पिके भुईसपाट झाली असून वृक्ष विजेचे खांब देखील कोसळले आहेत. तर अनेक भागात पिकांचे अतोनात नुकसान झाल्याने शेतकऱ्यावर पुन्हा एकदा आर्थिक संकट कोसळले आहे.
दरम्यान, सिन्नर तालुक्यासह उत्तर भागातील नायगाव खोऱ्यात वादळी वाऱ्याचा मुसळधार पावसाने शेती पिकांच्या नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी विजेचे खांब पडल्याने विद्युत पुरवठा बंद झाला तर झाडे रस्त्यावर आडवी पडल्याने वाहतूक देखील बंद झाल्याचे पाहायला मिळाले. तालुक्यातील नांदूर शिंगोटे, दापूर, दोडी, चापडगाव, भोजापूर आदी परिसरात मेघगर्जनेस अवकाळी पावसाने हजेरी लावली.
मालेगाव तालुक्यातील अनेक भागात चार वाजेच्या सुमारास गारपीट झाल्याने परिसरातील शेतकऱ्यांसह ग्रामस्थांची एकच धावपळ झाली. रब्बीसह गव्हाची काढणी सुरू आहे, तर काही शेतकऱ्यांनी गहू कापून शेतात ठेवल्याने तो पावसात भिजला गेला आहे. लासलगाव परिसरातही अवकाळी पावसाने संपूर्ण परिसराला झोडपून काढले. कांदा घरी घेऊन येणाऱ्या शेतकऱ्यांची चांगली धावपळ उडाली. तर इगतपुरी तालुक्यासह अनेक भागात गारा आणि वादळीवाऱ्यासह अवकाळी पावसाने थैमान घातल्याचे चित्र पाहायला मिळाले. या पावसाने शेकडो हेक्टरवरील गहू, हरभरा पिके आडवी झाली असून कांदे, गहू आणि बटाटे या काढणीस आलेल्या पिकांचे नुकसान झाले आहे.
त्याचबरोबर जिल्ह्यातील नांदगाव, देवळा, सटाणा आदी भागातही मोठ्या प्रमाणावर पावसाने हजेरी लावून शेती पिकांचे नुकसान केले आहे. एकीकडे शेतमालाला भाव नसताना दुसरीकडे मागील काही महिन्यांपासून अवकाळी पाऊस बरसतो आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होत असल्याने शेतकरी मेटाकुटीला आला आहे. आधीच अवकाळीच्या नुकसानीचे अद्याप काही शेतकऱ्यांना पैसे आलेले नसताना अशातच पुन्हा एकदा अवकाळी पाऊस हजेरी लावत असल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.
नांदगाव तालुक्यातही अतोनात नुकसान
नांदगाव तालुक्यातही वादळी वाऱ्यासह गारांच्या वर्षवास झालेल्या अवकाळी पावसाच्या तडाख्याने काढणीला आलेला गहू, हरभरा, उन्हाळ कांदा, भाजीपाला आणि पिकांना फटका बसला आहे. अचानक आलेल्या अवकाळी पावसाने शहरातील बाजारपेठेत एकच धांदल उडाली. शेतात काढणी बरोबर आलेल्या गावाबरोबर हरभरा कांदा तसेच भाजीपाल्याचे इतर पिकांना देखील गारांसह कोसळत असलेल्या पावसाच्या तडाख्याने हातात आलेला शेतमाल वाया जाण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. नांदगाव तालुक्यात अगोदर अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे अगोदर नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी होत आहे.