Maharashtra Weather Update: राज्यभरात अवकाळी पावसाचा तडाखा; पाऊस आणि गारपिटीमुळे पिकांचं मोठं नुकसान
वादळी पावसामुळे अनेकांच्या घरावरील पत्रे उडून गेले आणि पावसाचं पाणी शिरलं. दरम्यान या नुकसानाचे ना पंचनामे होतायंत ना नुकसान भरपाई मिळत आहे. अशा परिस्थितीत करायचं काय, जगायचं कसं, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.
![Maharashtra Weather Update: राज्यभरात अवकाळी पावसाचा तडाखा; पाऊस आणि गारपिटीमुळे पिकांचं मोठं नुकसान Maharashtra Weather Update Unseasonal rain heavy crop damage due to rain and hail storm Maharashtra Weather Update: राज्यभरात अवकाळी पावसाचा तडाखा; पाऊस आणि गारपिटीमुळे पिकांचं मोठं नुकसान](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/10/5f8b156ed0a5440e83c7a049fe0f0b42168109712802889_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई: अवकाळीच्या संकटामुळे शेतकऱ्यांच्या अश्रूंचा बांध पुन्हा फुटला आहे. राज्यावरील अवकाळीचं (Maharashtra Unseasonal Rain) संकट काही केल्या कमी होत नाही. पुन्हा एकदा अवकाळीनं अनेक भागांत अवकृपा केली आहे. राज्यातील 14 जिल्ह्यांमधील तब्बल 28 हजार हेक्टरवरील पिके जमीनदोस्त झाली. नाशिक जिल्ह्यातील देवळा, नांदगाव, निफाड, सिन्नर, कळवण,ईगतपुरी, चांदवड, दिंडोरी या तालुक्यात अवकाळी पावसामुळं मोठं नुकसान केलं आहे. दरम्यान, हवामान विभागानं (Meteorological Department) दिलेल्या अंदाजानुसार आजही राज्यात अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. आज विदर्भ अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज आहे. उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी विजांसह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
या गारपिटीमध्ये कांदा, द्राक्ष, गहू, आंबा, भाजीपाल्यासह अनेक पिकांचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे. पुण्यातही मुसळधार पावसासह काही भागात गारपीट झाली. तर तिकडे वाशिम जिल्ह्यातील मंगरूळपीर तालुक्याला अवकाळी पावसानं अक्षरश: झोडपून काढलंय. या वादळी पावसामुळे अनेकांच्या घरावरील पत्रे उडून गेले, आणि पावसाचं पाणी शिरलं. दरम्यान या नुकसानाचे ना पंचनामे होतायंत ना नुकसानभरपाई मिळत आहे. अशा परिस्थितीत करायचं काय, जगायचं कसं, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. राज्यातील अवकाळी पावसाचा आढावा आणि त्यामुळे झालेल्या नुकसानीवरील उपाययोजनांबाबत आज मुख्यमंत्री महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात येणार आहे. सह्याद्री अतिथी गृह येथे ही बैठक पार पडणार आहे. एक वाजता या बैठकीचे आयोजन करण्यात आलेला आहे. या बैठकीला मुख्यमंत्री, कृषी मंत्री आणि अधिकारी उपस्थित असणार आहेत.
अहमदनगर
अहमदनगर जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे जिल्ह्यात 6 हजार 685 हेक्टरवरील शेतीला फटका बसल्याचे प्राथमिक अहवालातून स्पष्ट झालंय. जवळपास 12 हजार 483 शेतकर्यांचे नुकसान या अवकाळीने केलं आहे. आधीच मागील अतिवृष्टीची नुकसान भरपाई न मिळाल्याने शेतकरी हैराण असताना पुन्हा झालेल्या अवकाळीने अनेक शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावून घेतला आहे.
वाशिम
वाशिम जिल्ह्यातील मंगरूळपीर तालुक्याला अवकाळी पावसाने चांगलीच तारांबळ उडाली आहे. अनेकांच्या घरावरील पत्रे उडून गेले, घरात पावसाचे पाणी शिरले. तर मालेगाव तालुक्यात ही गारपीट फळबागांना आणि भाजीपाल्याचे नुकसान झाले आहे.
अकोला
अकोल्यातील पातूर तालूक्यातील आस्टूल, पास्टूल गावाला पुन्हा वादळी वारा, पाऊस आणि गारपीटीचा तडाखा बसला आहे. कांदा आणि लिंबू पिकाचं नुकसान झाले आहे. महिनाभरात तब्बल चौथ्यांदा परिसराला गारपीटीचा फटका बसला आहे. धाराशिव कळंब येथे भाजीपाला पिकाचे मोठे नुकसान झाले आहे.
छत्रपती संभाजीनगर
छत्रपती संभाजीनगर मधील कन्नड तालुक्यात गारपीट झाली. 6 ते 7 वाजण्याच्या दरम्यान ही गारपीट झाली. कन्नड तालुक्यातील जेहुर अनो बोलठान या गावची ही दृश्य आहेत. इतर गावातही मोठ्या प्रमाणावर गारपीट झाली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)