Trimbakeshwar Controversy : त्र्यंबकेश्वर मंदिर प्रवेशाच्या वादाचा परिणाम; भाविकांची संख्या 40 ते 50 टक्क्यांनी रोडावली
Trimbakeshwar Controversy
Trimbakeshwar Controversy : नाशिकमधील त्र्यंबकेश्वर मंदिर (Trimbakeshwar Jyotirling Mandir) प्रवेशाच्या वादाचा परिणाम भाविक (Devotee) तसंच पर्यटकांच्या (Tourist) संख्येवर जाणवत आहे. दोन-चार दिवसांत पर्यटकांची संख्या रोडावली असून व्यावसायिकांच्या उत्पन्नावर त्याचा परिणाम जाणवू लागला आहे. ऐन सुट्ट्यांच्या काळात पर्यटक येत नसल्याने वाद लवकर मिटवा अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
भाविकांची संख्या 40 ते 50 टक्क्यांनी रोडावली
उरुसाच्या मिरवणुकी दरम्यान त्रंबकेश्वराला धूप दाखवण्यासाठी मुस्लीम धर्मीय बांधव मंदिराच्या उत्तर दरवाजाजवळ आले आणि त्यातून वाद उफाळून आला. हिंदू-मुस्लिम वादाची कधी साधी चर्चाही नसलेल्या त्रंबकेश्वर नगरीत तणावाची स्थिति निर्माण झाली. हिंदुत्ववादी संघटनांचे आंदोलनं झाली, पोलिसांची जादा कुमक तैनात करण्यात आली. याचा परिणाम त्रंबकेश्वरमधील भाविकांच्या संख्येवर जाणवत आहे. रस्ते ओस पडले आहेत, चौक रिकामे झाले आहेत. हॉटलचे टेबल रिकामे आहेत, फूल प्रसादाच्या साहित्याला ग्राहक नाहीत. भाविकांची संख्या 40 ते 50 टक्क्यांनी रोडावली असल्याचं व्यावसायिक सांगत आहेत.
रोजगाराला फटका
त्र्यंबकेश्वर नगरीची उपजीविका मंदिरावर आणि इथे होणाऱ्या कालसर्प शांती नारायण नागबली आशा विविध पूजांवर चालते. देवस्थानच्या बाजूलाच प्रसादाची, फुलांची पूजा साहित्यची दुकाने आहेत. मंदिरात येणारा भाविक त्यांच्याकडून प्रसाद खरेदी करतो. त्यावरच त्याचा उदरनिर्वाह चालतो. मात्र भाविकांची संख्या कमी झाल्याने त्यांच्या उत्पन्नावर परिणाम जाणवत आहे. कोरोना काळात व्यवसाय बंद होते. त्यातून सावरत असताना आता कुठे उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये उत्पन्न मिळण्याची आशा वाटत असतानाच रोजगाराला फटका बसला आहे.
वाद मिटून शांतता प्रस्थापित व्हावी
जी व्यथा पूजा साहित्य विक्रेत्यांची आहे तीच परिस्थिती हॉटेल व्यावसायिकांची आहे. हॉटेल अक्षरशः ओस पडली आहेत. कोरोना काळात जशी भाविकांची संख्या रोडावली होती तशीच परिस्थिती आता जाणवत असल्याचं व्यावसायिक सांगत आहेत. म्हणून जो वाद सुरु आहे तो मिटून शांतता प्रस्थापित व्हावी अशी अपेक्षा स्थानिक व्यक्त करत आहेत
वादाची व्यावसायिक आणि ग्रामस्थांना धग
त्र्यंबकेश्वर नगरीत रोज हजारो भाविक येत असतात, त्यातून लाखो रुपयांची उलाढाल होत असते. यावरच गावगाडा सुरु असतो. मात्र एका घटनेने गावाची शांतता तर भंग झालीच आहे रोज एकमेकांच्या सुखदुःखाला उभे राहणारे आता एकमेकांच्या विरोधात उभे राहिले आहे. याची झळ आता प्रत्येकाच्या खिशाला जाणवू लागली आहे. बाहेरचे लोक येऊन आगीत तेल ओतून जातात मात्र त्याची धग हळूहळू आता त्रंबकेश्वरच्या व्यावसायिकांना आणि ग्रामस्थांना जाणवू लागली आहे. त्यामुळे वातावरण आता लवकरात लवकर निवळावे अशी अपेक्षा व्यक्त होत आहेत.
VIDEO : Trimbakeshwar Temple : त्र्यंबकेश्वरमध्ये भाविकांच्या संख्येत घट, व्यावसायिकांचं नुकसान : ABP Majha