(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nashik News : दुचाकीवर असताना पोलिसाला हार्ट अटॅक, बघ्यांची गर्दी; तरुण ठरला देवदूत, नेमकं काय घडलं?
Nashik News : ड्युटीवर निघालेल्या पोलिसाला दुचाकीवरच हृदयविकाराचा झटका आला. पण तरुणाने दाखवलेल्या समयसूचकतेने संबंधित पोलिसाचे प्राण वाचले. नाशिकमधील मनमाडमध्ये हा प्रकार घडला.
Nashik News : आजकाल चालता बोलता मृत्यू ओढवण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे रस्त्याने चालताना सावधगिरी बाळगली पाहिजे. नाशिकच्या (Nashik) मनमाडमध्ये असाच प्रकार समोर आला आहे. ड्युटीवर निघालेल्या पोलिसाला (Police) दुचाकीवरच हृदयविकाराचा झटका (Heart Attack) आला. पण तरुणाने दाखवलेल्या प्रसंगावधानाने संबंधित पोलिसाचे प्राण वाचले.
मागील काही वर्षांत हृदयविकाराच्या झटक्याचे प्रमाण वाढत आहे. वयाच्या तीस वर्षांपासून ते साठ ते सत्तर वयापर्यंत हार्ट अटॅक येण्याच्या घटना वाढत आहेत. शिवाय कुठेही, कधीही हृदयविकाराचा झटका येत असल्याने चालता बोलता माणसाचा मृत्यू होत आहे. असाच काही प्रकार नाशिक जिल्ह्यातील मनमाड (Manmad) शहरात घडला आहे.
नेमकं काय घडलं?
तर झालं असं की ड्युटीवर निघालेल्या पोलिसाला रस्त्यातच हृदयविकाराचा झटका आल्याने ते दुचाकीवरुन खाली पडले. काही क्षण तसेच ते पडून राहिले. यामुळे रस्त्यावर बघ्यांची गर्दी झाली. दारु पिऊन पडला असेल म्हणून काही वेळ लोकांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं. पण एका व्यक्तीला संबंधित पोलिसाला हदयविकाराचा झटका आल्याचं कळलं आणि त्याने समयसूचकता दाखवून त्यांचे प्राण वाचवले. 'देव तारी त्याला कोण मारी' या म्हणीचा प्रत्यय मनमाड शहरातील नागरिकांना आला.
दरम्यान नागेश दांडे नावाचे रेल्वे पोलीस (Railway Police) दुचाकीवरुन ड्युटीवर होते. त्यावेळी शहरातील मुख्य बाजार पेठेत त्यांच्या छातीत दुखू लागलं अन् काही क्षणांत ते दुचाकीवरुन खाली पडले. अचानक घडलेल्या या घटनेमुळे तिथे मोठ्या प्रमाणात गर्दी झाली. कुणी व्हिडीओ काढत होतं तर कुणी दारू पिऊन पडल्याचं सांगत होतं.
तिथून भागवत झालटे हा तरुण जात असताना गर्दी पाहून नेमकं काय झालंय, असा कानोसा घेण्यासाठी तो थांबला. नंतर नागेश यांना अस्वस्थ पाहून भागवतच्या लक्षात आलं की त्यांना हार्ट अटॅक आला आहे. भागवतने क्षणाचाही विलंब न लावता नागेश यांच्या छातीवर दोन्ही हातांनी तीन-चार वेळा दाब देऊन त्यांना तोंडाने श्वास घेण्यास भाग पाडले.
देवदूत भेटल्याची चर्चा
भागवत नावाचा या तरुणाने वारंवार ही कृती केल्यानंतर पोलीस हवालदार नागेश शुद्धीवर आले. त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. डॉक्टरांनी तपासणी केली असता नागेश यांना हृदयविकाराचा जोरदार धक्का बसल्याचं त्यांनी सांगितलं. मात्र भागवत झालटे या तरुणाने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे एका पोलिसाचे प्राण वाचले होते. भागवत हा एकप्रकारे नागेश यांच्यासाठी देवदूतच भेटल्याची चर्चा मनमाडच्या नाक्यानाक्यावर सुरु होती.