Nashik Saptshrungi : नाशिकच्या सप्तशृंगी गडाजवळचा मार्कंडेय पर्वत, मार्कंड ऋषींचे भारतातील एकमेव मंदिर, असा आहे इतिहास?
Nashik News : समुद्रसपाटीपासून 3400 मीटर उंच मार्कंडेय पर्वताच्या माथ्यावर मार्कंड ऋषींचे मंदिर असून हे भारतातील एकमेव असे मंदिर आहे.
नाशिक : नाशिक जिल्ह्यातील सप्तशृंगी देवी मंदिर महाराष्ट्रासह देशभरात प्रसिद्ध आहे, याच गडाच्या समोरील बाजूस उंचपुरा आणि पाहताच क्षणी नजरेत भरणारा मार्कंडेय किल्ला देखील महत्त्वाचा मानला जातो. काही दिवसांपूर्वी सोमवती अमावस्येला गडावर दरड कोसळल्याने काही भाविक जखमी झाल्याच्या घटना घडली होती. त्यानंतर ऋषिपंचमीनिमित्त भव्य यात्रेचे आयोजन करण्यात येते. मात्र यंदा खबरदारी म्हणून यात्रा रद्द करण्यात आली. त्यामुळे पुन्हा एकदा मार्कंडेय पर्वत चर्चेत आला आहे.
नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्यात वणी गावाजवळ सप्तशृंगी देवी मंदिर आहे. सप्तशृंगी देवीचे दर्शन घेतल्यानंतर बाहेर पडत असताना समोरील बाजूस किंवा सप्तशृंगी गडावरील सतीचा कडा या भागाजवळून मार्कंडेय पर्वत भाविकांच्या दृष्टीस पडतो. असं म्हटलं जात की, समुद्रसपाटीपासून 3400 मीटर उंच मार्कंडेय पर्वताच्या माथ्यावर मार्कंड ऋषींचे मंदिर असून हे भारतातील एकमेव असे मंदिर आहे. तसेच हजारो वर्षापूर्वी मार्कंडेय पर्वतावर मार्कंड ऋषींनी ध्यानसाधना करून सप्तशृंगी मातेच्या दिशेने बसून दुर्गाशक्ती नावाचा ग्रंथ लिहल्याचे स्थानिक सांगतात. त्यामुळे या पर्वतासह परिसराला महत्त्व प्राप्त झाले असून दरवर्षीं सोमवती अमावस्येला तसेच ऋषिपंचमीला हजारो भाविक गडावर दाखल होत असतात. त्याचबरोबर अनेक ट्रेकर्स सुद्धा या गडावर येत असतात.
नाशिक जिल्ह्यातील सप्तशृंगी गडासमोरच दिसणाऱ्या डोंगरावर मार्कंड्या किल्ला आहे. सप्तशृंगीगड व रवळ्याजावळ्या गडांपासून खिंडीमुळे वेगळ्या झालेल्या डोंगरावर पुरातन काळी मार्कंडेय ऋषींचे वास्तव्य होते, असे सांगितले जाते. त्यामुळे हा डोंगर व त्यावरील किल्ला मार्कंड्या या नावाने ओळखला जातो. मार्कंड ऋषींचे वास्तव्य होते, म्हणून त्यास मार्कंडेय पर्वत म्हणून ओळखले जाते. त्यामुळे सोमवती अमावस्या आणि ऋषिपंचमीला भाविकांची गर्दी होत असते. तर नाशिकपासून 40 किलोमीटरवर वणी गावाजवळ सापुतारा मार्गावर हा किल्ला असून या गावातून एक रस्ता कळवण गावाकडे जातो. या रस्त्यावर वणीपासून 9 कि.मी. अंतरावर गोबापूर नावाचे गाव आहे. हे मार्कंड्या किल्ल्याच्या पायथ्याचे गाव आहे. या गावापासून रस्तावर चढत जाऊन 2 किलोमीटरवरील मुळाणेबारी खिंडीत येतो. येथपर्यंत एसटीने किंवा खाजगी वाहनाने जाता येते. या खिंडीतून कळवण गावाकडे जाताना उजव्या बाजूची वाट रवळ्या–जावळ्याला तर डाव्या बाजूची मार्कंड्या किल्ल्यावर जाते. भाविकांच्या सोयीसाठी पायथ्यापासून थेट मंदिरापर्यंत विविध ठिकाणी संरक्षक जाळ्या बसवण्यात आल्या आहेत.
किल्ल्याचा इतिहास काय सांगतो...
वणीजवळच्या सप्तशृंगी देवी मंदिर जसे प्रसिद्ध आहे, तसेच अनेक भाविक सप्तशृंगी दर्शनानंतर मार्कंडेय ऋषींच्या दर्शनासाठी येत असतात. अनेक बाहेरील भाविकांना गडाची माहिती नसल्याने जिल्ह्यातील भाविक प्रामुख्याने या गडावर येत असतात. तर मार्कंडेय ऋषींचा इतिहास असा सांगितला जातो की, शहाजहानच्या काळात दक्षिणसुभा औरंगजेबाच्या ताब्यात होता. औरंगजेबाने अलिवर्दीखानाला नाशिक जिल्ह्यातील किल्ले जिकण्याचा हूकूम दिला. इसवी सन 1639 मध्ये अलिवर्दी खानाने सप्तशृंगीगड, मार्कंड्या, रवळ्याजावळ्या, धोडप हे सर्व किल्ले जिंकून घेतले. याबद्दलचा फारसीतील शिलालेख इंद्राई किल्ल्यावर असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. यानंतर वणी – दिंडोरीच्या लढाईनंतर नाशिक परिसरातील किल्ले शिवाजी महाराजांनी जिंकून घेतले. त्यात मार्कंड्याचा समावेश होता. शिवाजी महाराजांच्या निधनानंतर मोगलांनी हे किल्ले परत जिंकले, असा इतिहास सांगितला जातो.
इतर महत्वाची बातमी :