Nashik News : कबड्डीच्या सामन्यावरून उफाळला वाद, नाशिकमध्ये विद्यार्थिनींचा जोरदार राडा, शाळेबाहेरच फ्री स्टाईल हाणामारी
Nashik News : नाशिकच्या सिडको परिसरातील पवननगर येथे कबड्डी स्पर्धेनंतर शालेय विद्यार्थिनींमध्ये फ्री स्टाईल हाणामारी झाल्याची घटना घडली.

Nashik News : चौकाचौकात युवक आणि तरुणांमध्ये हाणामाऱ्यांचे प्रकार नित्याचेच झाले आहेत. मात्र, सिडको परिसरातील पवननगर (Pavan nagar) येथे कबड्डी स्पर्धेनंतर शालेय विद्यार्थिनींमध्ये (Students) फ्री स्टाईल हाणामारी झाल्याची घटना घडली. या घटनेची नाशिक (Nashik News) शहरात जोरदार चर्चा रंगली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, शुक्रवारी (दि. 26) दुपारी साडेबाराच्या सुमारास पवननगर येथील एका शाळेजवळ आठ ते दहा विद्यार्थिनी जात होत्या. याच दरम्यान, कबड्डी स्पर्धेत एका संघाने विजय मिळविल्याचा राग मनात धरून दुसऱ्या गटातील एका विद्यार्थिनीने त्या गटातील विद्यार्थिनीला थांबवून मारहाण करण्यास सुरुवात केली.
दोन्ही गटातील विद्यार्थिनी आक्रमक
स्थानिक नागरिकांनी भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला, परंतु दोन्ही गटातील विद्यार्थिनी अत्यंत आक्रमक झाल्या होत्या. सुमारे चार ते पाच मिनिटे ही हाणामारी सुरू राहिल्याने बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. काहींनी या घटनेचा व्हिडीओ काढून सोशल मीडियावर टाकल्याने या प्रकाराची नाशिकमध्ये जोरदार चर्चा रंगली आहे.
नवीन सिडकोत सिगारेट पैशांवरून हाणामारी
दरम्यान, नवीन सिडको येथील एका हॉटेलमध्ये सिगारेट व लाइटरच्या पैशांवरून झालेल्या वादातून हॉटेल व्यवस्थापन आणि ग्राहकांमध्ये जोरदार हाणामारी झाली. या प्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात परस्परविरोधी तक्रारी नोंदविण्यात आल्या आहेत. अक्षय मधुकर पवार यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, गुरुवारी रात्री ते त्यांच्या मित्रांसह हॉटेल महाराजामध्ये गेले होते. तिथे हॉटेल मालक सूर्या, मॅनेजर, वॉचमन आणि टपरीचालक यांनी संगनमत करून वाहनाच्या जॅकचा पाना काढून त्यांच्यावर हल्ला केला. या मारहाणीत सर्जेराव मोरे, वेदांत रोकडे आणि बाळू मोरे हे देखील जखमी झाले. दरम्यान, दुसरी फिर्याद देवाशीश मेहन सादुखाँ यांनी दाखल केली आहे. त्यांच्या मते, सिगारेटच्या पैशांवरून सुरेश टपरीवालासोबत संशयित सर्जेराव मोरे आणि अक्षय पवार यांचे भांडण झाले. हे भांडण सोडविण्यासाठी हॉटेलचे मालक सूर्या आणि मॅनेजर रोहन मुठे पुढे आले असता, संशयितांनी त्यांच्यावर शिवीगाळ केली आणि दगडफेक करत मारहाण केली. या संपूर्ण घटनेबाबत अंबड पोलिस ठाण्यात दोन्ही बाजूंनी गुन्हे दाखल करण्यात आले असून, पुढील तपास सुरु आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या






















