Ajit Pawar : पुढील दीड वर्षात अजित पवार मुख्यमंत्री होतील, झिरवाळ बोलताच टाळ्यांचा कडकडाट, अजितदादा म्हणाले...
Ajit Pawar : पुढील दीड वर्षात अजित पवार मुख्यमंत्री असं नरहरी झिरवाळ बोलताच उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट करुन प्रतिसाद दिला. शिवाय सिन्नरचे आमदार माणिकराव कोकाटे यांनी अजित पवार मुख्यमंत्री झाले पाहिजे, असं भाष्य केलं.
Nashik News : एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून अजित पवार (Ajit Pawar) यांचा सातत्याने भावी मुख्यमंत्री (Future CM) म्हणून उल्लेख केला जातो. त्यातच पुढील दीड वर्षात अजित पवार मुख्यमंत्री असं विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ (Narhari Zirwal) बोलताच उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट करुन प्रतिसाद दिला. नाशिकच्या (Nashik) सुरगाणा तालुक्यातील हतगडमध्ये महाविकास आघडीच्या (Maha Vikas Aghadi) काळात दिलेल्या निधी प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शेतकरी कृतज्ञता मेळाव्याचे आयोजन केलं होतं. त्यात नरहरी झिरवाळ आणि सिन्नरचे आमदार माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांनी अजित पवार मुख्यमंत्री झाले पाहिजे, असं भाष्य केलं.
भाषण करुन मुख्यमंत्री होत नाही, 145 आमदारांचं पाठबळ लागतं : अजित पवार
नरहरी झिरवाळ आणि माणिकराव कोकाटे यांनी केलेल्या भाष्याला अजित पवार यांनी उत्तर दिलं. भाषणासाठी उभे राहिल्यानंतर अजित पवार म्हणाले की, "अमुक एक मुख्यमंत्री झाला पाहिजे असं वक्ते बोलले, पण भाषण करुन मुख्यमंत्री होत नाही त्यासाठी 145 आमदारांचे संख्याबळ पाहिजे." तसंच महाविकास आघाडीच्या ज्या पक्षाची जिथे ताकद आहे ती जागा लढवणार असे अजित पवार यांनी स्पष्ट केले. एकंदरीत अजित पवार यांचा स्वभाव पाहता अद्याप मुख्यमंत्रिपदासाठी आपल्या नावाची चर्चा करु नका असे ते अधिकारवाणीने बोलू शकले असते पण त्यांनी तसे न करता एकप्रकारे मूक संमती दिली.
महाविकास आघाडीमध्ये भावी मुख्यमंत्रिपदासाठी स्पर्धा
दरम्यान, राज्यातील राजकीय पक्षांना सध्या निवडणुकांचे (Election) वेध लागले आहेत. त्यादृष्टीने सर्वच राजकीय पक्षाच्या बैठकांचे सत्र आणि मोर्चेबांधणी सुरु आहे, त्यातच महाविकास आघाडीमध्ये भावी मुख्यमंत्रिपदासाठी जणू स्पर्धाच सुरु आहे. समर्थक उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray), सुप्रिया सुळे (Supriya Sule), नाना पटोले (Nana Patole), अजित पवार (Ajit Pawar) या सर्वांना भावी मुख्यमंत्री (Future Chief Minister) म्हणून प्रेझेंट करत आहेत. त्यात कायमच चर्चेच्या केंद्रस्थानी असणाऱ्या अजित पवार यांच्याबाबतीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) आमदारांकडून सातत्याने भावी मुख्यमंत्री, किंवा दादा मुख्यमंत्री झाले पाहिजे असा उल्लेख वजा प्रचार केला जात आहे.
VIDEO : Narhari Zirwal : अजित पवार यांना आपण मुख्यमंत्री करुच - नरहरी झिरवाळ
हेही वाचा