(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nashik NMC : कर वसुलीसाठी नाशिक मनपा अॅक्शन मोडवर, 14 गाळेधारकांना दणका
Nashik News : मालमत्ता, नळपट्टी व संकीर्ण कर वसुलीचे उद्दिष्ट मार्चअखेर पूर्ण करण्याचे नाशिक मनपासमोर मोठे आव्हान आहे. त्यामुळे वसुलीसाठी थकबाकीदारांवर जप्तीची कारवाई सुरु करण्यात आली आहे.
Nashik NMC News नाशिक : मालमत्ता, नळपट्टी व संकीर्ण कर वसुलीचे उद्दिष्ट मार्चअखेर पूर्ण करण्याचे नाशिक महापालिकेसमोर (Nashik NMC) मोठे आव्हान आहे. महापालिकेकडून वसुलीसाठी थकबाकीदारांना दंड व्याजात सवलत व जप्तीची कारवाई सुरु करण्यात आली आहे.
या मोहिमेचाच भाग म्हणून गुरुवारी अली अकबर रुग्णालय येथील सोनिया गांधी मार्केटजवळ (Sonia Gandhi Market) 18 पैकी 14 गाळे धारकांना थकबाकी असल्याने दुकाने सील करण्यात आली. गेल्या महिन्यात मराठा सर्वेक्षणाचे काम असल्याने वसुलीला पुन्हा खोडा बसला होता.
थकबाकीधारकांमध्ये चिंता
तसेच उद्दिष्ट पूर्ण करण्यात सातत्याने अडचणी येत आहेत. त्यातच विविध योजनांमुळे महानगरपालिकेची आर्थिक स्थिती बिकट झाल्याने कर वसुलीसाठी फेब्रुवारीत जोरदार मोहीम सुरु करण्यात आली आहे. महापालिकेने थकबाकी वसुलीसाठी कठोर कारवाई सुरु केल्याने थकबाकी धारकांमध्ये चिंता व्यक्त करण्यात येत आहे.
आयुक्तांकडून कठोर कारवाईचे आदेश
शहरात मनपा मालकीचे असंख्य शॉपिंग व हॉकर्स गाळे आहेत. संबंधित संकुल, गाळेधारक मनपाचे भाडे व संकीर्ण कर अदा करण्यात सातत्याने टाळाटाळ करतात. घरपट्टी, पाणीपट्टीबरोबरच संकीर्ण कर वसुली विभागाकडेही आयुक्त तथा प्रशासक रवींद्र जाधव यांनी लक्ष केंद्रित केले आहे. जाधव यांनी कर्मचाऱ्यांना थकबाकी वसुलीसाठी प्रयत्न करतानाच कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले.
गाळेधारकांकडे आठ लाखांची थकबाकी
यामुळे सोनिया गांधी मार्केट जवळील एकूण 18 हॉकर्स गाळेधारकांपैकी 14 गाळ्यांना सील ठोकण्यात आले. या गाळेधारकांकडे एकूण 8 लाख 47 हजार 661 रुपये थकबाकी होती. गाळे सील झाल्याने संबंधित व्यावसायिकांचा थेट व्यवसायच बंद झाला आहे. शहरातील थकबाकीदारांनी थकीत रक्कमेचा भरणा करून मनपास सहकार्य करावे. अन्यथा थकबाकीदारांची शॉपिंग, हॉकर्स गाळे सील बंद करण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे.
शहरातील 44 हजार थकबाकीदारांना नोटिसा
पाणीपट्टीची थकीत वसुली करण्यासाठी महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून शहरातील ४४ हजार ३८५ थकबाकीदारांना नोटिसा बजाविण्यात आल्या आहेत. आठ दिवसात थकबाकी न भरल्यास नळजोडणी खंडित केली जाणार आहे. घरपट्टीतून यंदा १६६ कोटी रुपयांचा महसूल प्राप्त झाला. परंतु पाणीपट्टीतून मात्र अपेक्षित अशी वसुली झाली नाही. जेमतेम ३८ कोटी रुपये पाणीपट्टीच्या माध्यमातून प्राप्त झाले. मागील वर्षाच्या तुलनेत तीन कोटींची पाणीपट्टीत घट आहे. पुढील महिन्यात लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागणार आहे. त्यापूर्वी महापालिकेच्या विविध विभागाने पाणीपट्टीची वसुली करण्यासाठी कंबर कसली आहे. सर्वप्रथम थकबाकीदारांविरोधात मोहीम आखण्यात आली आहे. शहरात 2 लाख 7 हजार नळ जोडणी धारक आहे. त्यातील 44 हजार 385 नळजोडणी धारकांकडे 95 कोटी 75 लाख रुपयांची पाणीपट्टी थकली आहे.
आणखी वाचा
Manoj Jarange Patil : "...तर मंडल आयोगालाच चॅलेंज करतो, काय होईल ते बघूच मग"; मनोज जरांगेंचा इशारा