नाशिकमध्ये मनसे कार्यकर्त्यांत खदखद; मिसळ पार्टीतील नाराजीचा ठसका शिवतीर्थापर्यंत जाणार का?
राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीत महायुतीला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. ही निवडणूक संपताच नाशिकच्या मनसे कार्यकर्त्यांनी उघड नाराजी व्यक्त केली आहे.
नाशिक : यंदाच्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात काहीसे वेगळे चित्र दिसले. येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) या पक्षाने महायुतीला बिनशर्त बाठिंबा दिला. विशेष म्हणजे मसनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनीच याची घोषणा करून कार्यकर्त्यांना महायुतीचे (Mahayuti) काम करण्याचा आदेश दिला. खुद्द राज ठाकरे यांनीदेशील महायुतीच्या वेगवेगळ्या उमेदवारांच्या विजयासाठी जाहीर सभा घेतल्या. मात्र मनसे पक्षात स्थानिक पातळीवर काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या मनात मात्र वेगळीच भावना आहे. मनसेच्या कार्यकर्त्यांनी पहिल्यांदाच ही नाराजी उघडपणे बोलून दाखवली आहे. विशेष म्हणजे ही सर्व नाराजी ऑन कॅमेरा रेकॉर्ड झाली असून ती मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना दाखवली जाणार आहे. आता राज ठाकरे नेमका काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
कार्यकर्त्यांनी उघड नाराजी व्यक्त केली
लोकसभा निवडणुकीतील कार्यकर्त्यांच्या कामाचा आढावा आणि आगामी विधानसभा, मनपा निवडणुकीसाठी सज्ज राहण्याच्या दृष्टीने नाशिकमध्ये मनसेच्या कार्यकर्त्यांसाठी खास मिसळ पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. या पार्टीच्या निमित्ताने अधिकाधिक कार्यकर्त्यांनी व्यक्त व्हावे यासाठी प्रमुख पदाधिकाऱ्यांना या कार्यक्रमात बोलवण्यात आले नव्हते. या कार्यक्रमात राज ठाकरे यांची सुरुवातीपासून साथ देणारे कार्यकर्ते उपस्थित होते. या मिसळ पार्टीत वेगेगळ्या मुद्द्यांवर चर्चा झाली. तसेच कार्यकर्त्यांनी त्यांच्या अडचणी बोलून दाखवल्या. ही सर्व चर्चा कॅमेऱ्यात रेकॉर्ड करण्यात आली असून ती राज ठाकरे यांना दाखवली जाणार आहे.
या पार्टीच्या निमित्ताने लोकसभा निवडणुकीचा पाचवा टप्पा संपताच मनसेच्या कार्यकर्त्यांची खदखद बाहेर आली आहे. या कार्यकर्त्यांनी स्थानिक पदाधिकाऱ्यांविषयी जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. ऑन कॅमेरा कार्यकर्त्यांनी त्यांच्या या भावना व्यक्त केल्या आहेत. या पार्टीला दोनशेहून अधिक कार्यकर्ते उपस्थित होते. या मिसळ पार्टीतील नाराजीच्या फोडणीने मनसेच्या पक्षात चांगलाच ठसका पसरल्याचे बोलले जात आहे.
नाशिककडे लक्ष द्यावे, कार्यकर्त्यांची मागणी
नाशिकमधील मनसेच्या कार्यकर्त्यांनी स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या कारभाराविषयी उघड नाराजी व्यक्त केली. तसेच या नाराजीची राज ठाकरे यांनी दखल घ्यावी. नाशिक जिल्ह्याकडे विशेष लक्ष द्यावे, अशी मागणी या कार्यकर्त्यांनी केली. लोकसभा निवडणुकीत कार्यकर्त्यांनी पदरमोड करत स्वतःच्या खर्चातून महायुतीचे काम केले. पण स्थानिक पदाधिकाऱ्यांनी लक्ष दिले नाही, अशी खदखद अनेक कार्यकर्त्यांनी बोलून दाखवली.
राज ठाकरे काय निर्णय घेणार?
दरम्यान, नाशिक जिल्हा कधीकाळी मनसेचा बालेकिल्ला होता. नाशिकच्या महापालिकेवर मनसेची सत्ता होती. त्यामुळे नाशिक मनसेच्या जिव्हाळ्याचा विषय राहिलेला आहे. पण आता नाशिकमधील कार्यकर्ते नाराज आहेत. याची राज ठाकरे काय दखल घेणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
हेही वाचा :