(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nashik News : त्र्यंबकेश्वरमध्ये आणखी दोन बालविवाह रोखले! बालविकास अधिकारी अॅक्शन मोडवर, गोपनीय माहितीवरून गाठले विवाहस्थळ
Nashik News : जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभाग आणि युनिसेफच्या बैठकीत बालविवाह रोखण्यासाठी यंत्रणेतील सर्व घटकांनी पुढाकार घ्यावा असे निर्देश झेडपी सीईओ लीना बनसोड यांनी दिले होते.
Nashik News : जिल्हा परिषद नाशिक आणि युनिसेफने नाशिक जिल्ह्यातील बालविवाह रोखण्यासाठी कंबर कसल्यानंतर नाशिकमधील त्र्यंबकेश्वर मधील दोन बालविवाह रोखण्यात यश आलं आहे. हे बालविवाह रोखण्यात बाल विकास अधिकारी भारती गेजगे यांच्या टीमला यश आले आहे.
गोपनीय माहितीच्या आधारे गाठले विवाहस्थळ
त्र्यंबकेश्वर तालुक्यातील वावीहर्ष येथील 17 वर्षीय बालिकेचा, तर टाकेहर्ष येथील एका 16 वर्षीय मुलीचा बालविवाह होणार अशी माहिती मिळाली. दरम्यान तातडीने पथक संबंधित ठिकाणी पोहचत हे दोन्ही बालविवाह रोखण्यात बालविकास अधिकारी भारती गेजगे यांच्या टीमला यश आले आहे. याबाबत जिल्हा बाल संरक्षण कक्षास गोपनीय माहिती मिळाली. त्या आधारे बालिकांच्या वयाची शहानिशा केल्यानंतर तातडीने जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी भारती गेजगे यांच्या मार्गदर्शनात ही कारवाई करण्यात आली. विशेष म्हणजे जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभाग आणि युनिसेफची नुकतीच या संदर्भात बैठक पार पडली होती. या बैठकीत बालविवाह रोखण्यासाठी यंत्रणेतील सर्व घटकांनी पुढाकार घ्यावा असे निर्देश जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी दिले होते.
आणखी दोन बालविवाह रोखले!
लीना बनसोड यांच्या निर्देशानुसार त्र्यंबकेश्वर तालुक्यातील बालविकास अधिकारी भारती गेजगे यांना माहिती मिळाल्यानंतर त्यांनी रात्री 11 वाजता वावीहर्ष येथील 17 वर्षीय व टाकेहर्ष येथील 16 वर्षीय मुलीचा बालविवाह रोखला. हे दोन्ही बालविवाह रोखण्यासाठी संबंधित दोन्ही गावातील ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका, पोलीस प्रशासन यांना संपर्क करून घटनास्थळी भेट देत कारवाई करण्यास सांगितले. वावीहर्ष येथील ग्रामसेवक किसन राठोड अंगणवाडी सेविका संगिता किर्वे यांनी गावातील बालविवाह होणाऱ्या कुटुंबात जाऊन संबधित मुलीसह तिच्या पालकांची समजूत काढली. त्याचबरोबर टाकेहर्ष या गावातील ग्रासेमवक विजय आहिरे यांनी गावातील 16 वर्षीय अल्पवयीन मुलीच्या घरी जाऊन समुपदेशन करत विवाह थांबवला.
लोकांचे प्रबोधन करण्याची गरज
त्र्यंबकेश्वरच्या बाल विकास अधिकारी म्हणाल्या कि, बालविवाह रोखण्यासाठी खऱ्या अर्थाने लोकांचे प्रबोधन करण्याची गरज असून यासाठी स्थानिक पातळीवर विविध उपाययोजना राबविण्यावर भर देत आहोत. प्रशासन आणि स्थानिक आशा, अंगणवाडी सेविका यांच्या माध्यमातून बालविवाहांना आळा घालणे आवश्यक आहे. त्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत.