Nashik: तब्बल दीड हजार वादक, एक हजार ढोल आणि 500 ताशांचे महावादन, निनादला गोदाघाट
Nashik Mahavadan: सन 2016 पासून नववर्ष यात्रा स्वागत समितीतर्फे दरवर्षी महावादनाचा कार्यक्रम घेतला जात आहे.
नाशिक : तब्बल दीड हजार वादक, एक हजार ढोल आणि 500 ताशांचे महावादन महोत्सव नाशिकच्या गोदाकाठी पार पडला. दरवर्षीप्रमाणे यंदाही नाशिक शहरातील गोदाकाठावर महावादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यात तब्बल 1000 कलाकारांनी सामूहिक ढोल ताशा वादन सादर केले.
नाशिक महानगर पालिका आणि नववर्ष स्वागत यात्रा समिती, नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विविध सांस्कृतिक कार्यक्रमात आज सायंकाळी भव्य दिव्य महावादन झाले. तरुणवर्गाचे आकर्षण असलेला ढोल-ताशा वादनाचा महोत्सव यावेळी झाला. या वर्षी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवराज्याभिषेकाला 350 वर्ष पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने या 350 व्या हिंदू साम्राज्य स्थापना वर्षाच्या निमित्ताने छत्रपती शिवाजी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. एकूणच सकारात्मक ऊर्जेने 'मी' चे 'आम्ही' मध्ये परावर्तन करणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता. समिती तर्फे सायंकाळी सहा वाजता पाडवा पटांगण येथे “महावादन” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
सन 2016 पासून नववर्ष यात्रा स्वागत समितीतर्फे दरवर्षी महावादनाचा कार्यक्रम घेतला जात आहे. यावर्षी या महावादनाचं हे 7 वे वर्ष असून नाशिक जिल्ह्यातील सर्व ढोल पथकांमध्ये प्रेम , बंधुभाव आणि एकोपा ही भावना निर्माण व्हावी या उद्देशाने तब्बल जिल्ह्यातील 30 ढोल पथकांशी संपर्क साधून या महावादनाचे आयोजन करण्यात आले होते. विशेष म्हणजे या महावादनात 1000 ढोल, 200 ताशे आणि 1500 वादक आणि झांज वादकांच्या सहभागातून लय-ताल आणि नाद यांची एकतानता साधली गेली. या आयोजनात 100 स्वयंसेवकांनी काम केले आहे. या सर्व तीस पथक प्रमुखांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते झाला.
ध्वजप्रणाम करत भारत माता की जय या घोषणेने महावादन कार्यक्रमाची सुरवात झाली. त्यानंतर पहिला हात मग पाचवा हात यांचे वादन करण्यात आले. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज आणि जिजाऊ साहेब यांची गारद देण्यात आली. त्यानंतर शिवस्तुतीचे सादरीकरण करण्यात आले. यावेळी आमदार ढिकले यांनी ढोल पथकाचे निरीक्षण करून वादकांचे कौतुक केले. काही तरुण-तरुणी आणि बाल वादकांच्या कौशल्याला दाद दिली. त्यानंतर शरयू व्यास यांनी सामूहिक वंदे मातरम म्हणून कार्यक्रम संपन्न झाला. तब्बल दीड तास चाललेल्या या महावादनाने गोदातीर अक्षरशः दुमदुमून गेला होता. या कार्यक्रमाद्वारे खूप मोठ्या संख्येने नाशिककरांनी उपस्थित राहून तब्बल दीड ते दोन तास ब्रह्मनादाचा अनुभव घेतला.
उद्या होणारे कार्यक्रम...
रविवार 19 मार्च 2023 रोजी ‘पं. विष्णू दिगंबर पलुस्कर’ यांना समर्पित “अंतर्नाद” यात 1500 हुन अधिक विद्यार्थ्यांचे हिंदुस्थानी शास्त्रीय गायन, नृत्य, वादन कलेचे सादरीकरण, सायंकाळी 6 वाजता होणार आहे.
हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातल्या विविध वाद्यांचे वादक, गायक व नृत्य कलाकार असे 1500 पेक्षा जास्त कलाकार एकत्र येऊन सामुहिकरित्या अंतर्नाद हा कार्यक्रम होणार आहे. या सर्व कार्यक्रमांना रसिक नाशिककर नागरिकांनी मोठया प्रमाणात उपस्थित राहून कार्यक्रमाचा आनंद घ्यावा असे आवाहन केले आहे.