Advay Hire Arrested : अद्वय हिरे यांना पुन्हा तीन दिवस पोलीस कोठडी, दोन्ही वकिलांच्या युक्तीवादानंतर न्यायालयाचा आदेश
Advay Hire Arrested : ठाकरे गटाचे उपनेते अद्वय हिरे यांच्या अडचणीत वाढ झाली असून त्यांना पुन्हा तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
नाशिक : रेणुका सुत गिरणी कर्ज फसवणूक प्रकरणी शिवसेना उपनेते अद्वय हिरे (Advay Hire) यांचा तुरुंगातील मुक्काम आणखी तीन दिवस वाढला आहे. पाच दिवसांची पोलीस कोठडी संपल्यानंतर सोमवार 20 नोव्हेंबर रोजी हिरे यांना मालेगाव (Malegaon) न्यायालयाने पुन्हा तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. हिरे यांना 23 नोव्हेंबरला पुन्हा न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
दरम्यान, हिरे यांना न्यायालयात हजर करतेवेळी न्यायालयाच्या आवारात हिरे समर्थकांनी मोठी गर्दी केली. शिवसेनेतील फुटीनंतर अद्वय हिरे यांनी ठाकरे गटात प्रवेश केला. तेव्हापासून ते मंत्री दादा भुसे यांचे कट्टर विरोधक म्हणून ओळखले जातात. अनेक दिवसांपासून हिरे आणि मंत्री भुसे त्यांच्या राजकीय शीतयुद्ध सुरू असल्याचं पाहायला मिळतंय.
नेमकं प्रकरण काय?
मालेगावच्या रेणुका सुत गिरणीसाठी जिल्हा बँकेकडून साडेसात कोटी रुपयांचे कर्ज घेऊन त्याची परतफेड न केल्याने अद्वय हिरे यांच्या विरोधात रमजानपुरा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. नाशिक ग्रामीण पोलिसांनी त्यांना भोपाळवरून अटक करून न्यायालयासमोर हजर केले. त्यावेळी त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. मुदत संपल्यानंतर आज पुन्हा त्यांना न्यायालयात हजार करण्यात आले. यावेळी सुमारे दीड तास चाललेल्या दोन्ही युक्तीवादानंतर बँकेला सुट्टी असल्याने कर्ज प्रकरणात बँकेचे इतिवृत्त तपासणे बाकी आहे , कर्ज प्रकरणी अजूनही काही लोकांचे जबाब नोंदवणे बाकी असल्याचे कारण सांगून पोलिसांनी न्यायालयाकडे पोलीस कोठडीची मागणी केली. न्यायालयाने पुन्हा त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
आठ वर्ष जुनी केस
दरम्यान, बँकेची ही केस सुमारे आठ वर्ष जुनी असल्याचं सांगण्यात येत आहे. याबाबत कायदेशीर प्रक्रिया सुरु आहे. सुरुवातीपासूनच आम्ही न्यायालयीन लढाई लढत असून न्यायव्यवस्थेचा पूर्ण विश्वास असल्याचे डॉ.अपूर्व प्रशांत हिरे यांनी यापूर्वी सांगितलं होतं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मविआच्या नेत्यांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करत आहे, असा आरोप यापूर्वी अपूर्व हिरे यांनी केला होता.
>> कोण आहेत अद्वय हिरे? (Who Is Advay Hire)
- अद्वय हिरे हे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे उपनेते आहेत
- त्यांनी नाशिक जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष म्हणून काम पाहिलं आहे
- शिवसेनेतील फुटीनंतर त्यांनी काही दिवसांतच ठाकरे गटात प्रवेश केला होता
- शिवसेनेत प्रवेश करण्यापूर्वी ते भाजपमध्ये होते
- शिंदे गटातील मंत्री दादा भुसे यांचे कट्टर विरोधक म्हणून हिरे यांची ओळख