Advay Hire Arrested : शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते अद्वय हिरेंना अटक; ओळख पटू नये म्हणून हिरेंनी दाढी केल्याचीही चर्चा
Nashik News : शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते अद्वय हिरे यांना अटक करण्यात आली आहे. त्यांनी पोलिसांना गुंगारा देण्यासाठी दाढी केली का, अशी चर्चा सुरू झाली आहे.
नाशिक : सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांचे कट्टर विरोधक मानले जाणारे ठाकरे गटाचे उपनेते अद्वय हिरे (Advay Hire) यांना नाशिक ग्रामीण पोलीसांच्या (Nashik Police) स्थानिक गुन्हे शाखेने (Crime Branch) भोपाळमधून (Bhopal) ताब्यात घेत अटक केली आहे. मालेगावमधील (Malegaon) NDCC बँकेच्या विभागीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या तक्रारीनंतर अद्वय प्रशांत हिरे आणि एकूण 30 जणांविरोधात 30 मार्च 2023 ला रमजानपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.
अद्वय हिरे यांच्यासह हिरे कुटुंबातील इतर सदस्यांचाही आरोपींच्या यादीत समावेश होता. रेणुका यंत्रमाग औद्योगिक सहकारी संस्थेसाठी कर्ज घेण्याकरिता बनावट दस्तऐवज तयार करून बँकेची 7 कोटी 46 लाख रुपयांचे कर्ज उचलून फसवणूक केल्याचं तक्रारीत नमूद करण्यात आलं होतं.
दरम्यान, गुन्हा दाखल झाल्यानंतर आर्थिक गुन्हे शाखेकडून या प्रकरणाचा तपास सुरू होता. अद्वय हिरे यांनी अटकपूर्व जामिनासाठी मालेगाव सेशन कोर्टात अर्ज दाखल केला होता. त्यानंतर अंतरिम जामिनासाठी हायकोर्टाकडे धाव घेतली होती. मात्र 6 नोव्हेंबर 2023 ला तो अर्ज फेटाळताच स्थानिक गुन्हे शाखेने भोपाळमध्ये त्यांना बेड्या ठोकल्या आहेत.
गेल्या आठवडाभरापासून पोलिसांचे पथक त्यांच्या मागावर होते. विशेष म्हणजे नेहमी काळ्या केसांची मोठी दाढी ठेवणाऱ्या अद्वय हिरे यांच्या चेहऱ्यावर दाढीचा एक केसही आढळून आलेला नसून आपली ओळख पटू नये म्हणून त्यांनी दाढी काढल्याची चर्चा आहे.
आठ वर्ष जुनी केस
दरम्यान, बँकेची ही केस सुमारे आठ वर्ष जुनी असल्याचं सांगण्यात येत आहे. याबाबत कायदेशीर प्रक्रिया सुरु आहे. सुरुवातीपासूनच आम्ही न्यायालयीन लढाई लढत असून न्यायव्यवस्थेचा पूर्ण विश्वास असल्याचे डॉ.अपूर्व प्रशांत हिरे यांनी यापूर्वी सांगितलं होतं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मविआच्या नेत्यांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करत आहे, असा आरोप यापूर्वी अपूर्व हिरे यांनी केला होता.
प्रकरण काय?
NDCC बँकेचे विभागीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या तक्रारीनंतर अद्वय प्रशांत हिरे आणि एकूण 30 जणांविरोधात 30-03-2023 ला मालेगावच्या रमजानपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. बनावट दस्तऐवज तयार करून बँकेची 07 कोटी 46 लाख रुपयांची कर्ज उचलून फसवणूक केल्याचं म्हंटल होतं. गुन्हा दाखल झाल्यानंतर आर्थिक गुन्हे शाखेकडून तपास सुरू होता, त्यानंतर आरोपी अद्वय हिरे यांनी मालेगाव सेशन कोर्टात जामिनासाठी धाव घेतली होती, त्यानंतर अंतरिम जामीनासाठी हायकोर्टाकडे ते गेले होते मात्र 6-11-23 ला तो अर्ज फेटाळताच आज स्थानिक गुन्हे शाखेने भोपाळमधून त्यांना ताब्यात घेतले आहे.
>> कोण आहेत अद्वय हिरे? (Who Is Advay Hire)
- अद्वय हिरे हे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे उपनेते आहेत
- त्यांनी नाशिक जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष म्हणून काम पाहिलं आहे
- शिवसेनेतील फुटीनंतर त्यांनी काही दिवसांतच ठाकरे गटात प्रवेश केला होता
- शिवसेनेत प्रवेश करण्यापूर्वी ते भाजपमध्ये होते
- शिंदे गटातील मंत्री दादा भुसे यांचे कट्टर विरोधक म्हणून हिरे यांची ओळख