(Source: ECI/ABP News/ABP Majha)
नाशिक लोकसभेतून हेमंत गोडसेंची हॅटट्रिक हुकली, पालकमंत्री दादा भुसेंनी स्वीकारली पराभवाची जबाबदारी; म्हणाले....
Nashik Lok Sabha Election Result 2024 : नाशिक लोकसभेतून हेमंत गोडसेंचा पराभव झाला. त्यांच्या पराभवाची जबाबदारी पालकमंत्री दादा भुसे यांनी स्वीकारली आहे.
Nashik Lok Sabha Election Result 2024 : संपूर्ण राज्यभर चर्चेत आलेल्या नाशिक लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे शिवसेना ठाकरे गटाचे राजाभाऊ वाजे (Rajabhau Waje) यांनी बाजी मारली. सलग दोन टर्म खासदार राहिलेल्या हेमंत गोडसे (Hemant Godse) यांचा त्यांनी तब्बल एक लाख साठ हजारांच्या फरकाने पराभव केला. आता हेमंत गोडसे यांच्या पराभवाची जबाबदारी नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांनी स्वीकारली आहे.
दादा भुसे यांनी म्हटले आहे की, नाशिकमधील पराभवाची जबाबदारी मी स्वीकारतो. पालकमंत्री म्हणून मी पराभवाची जबाबदारी घेत आहे. नाशिकमधील अपयशाचे कारण मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांना सांगणार आहे. याबाबतचा अहवाल मी त्यांच्यासमोर सादर करणार आहे, असे त्यांनी म्हटले.
तुम्ही सांगत असाल तर मी राजीनामा देईन : दादा भुसे
लोकसभा निवडणुकीत राज्यात महायुतीला फटका बसला. याची जबाबदारी स्वीकारत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मला उपमुख्यमंत्री पदातून मुक्त करा, अशी विनंती पक्ष श्रेष्ठींकडे करणार असल्याची घोषणा केली. देवेंद्र फडणवीस यांच्या सारखे तुमची पण राजीनामा देण्याची तयारी आहे का? असा प्रश्न विचारला असता दादा भुसे यांनी म्हटले की, तुम्ही सांगत असाल तर मी राजीनामा देईन, असे त्यांनी म्हटले.
काय म्हणाले हेमंत गोडसे?
मला उमेदवारी उशिरा जाहीर झाल्यामुळे हा निकाल आला आहे. महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या धोरणामुळे ही अनुभूती आली. भाजपने उमेदवार घोषित केले. तेव्हाच पक्षाने उमेदवार देणे गरजेचे होते. विरोधातील उमेदवाराला जास्त दिवस मिळाले त्यामुळे आम्ही डेमेज झालो. लोकांना गोडसे उमेदवार असणार की, नाही हा संभ्रम निर्माण झाला त्याचा मला फटका बसला. माझा रोष कोणावर नाही. सर्वांनी काही चांगले काम झाले. कोणी काम केले नाही ते सर्वांना माहिती आहे. कोणाची ताकद मिळाली नाही ते सर्वांना माहिती आहे, अशी टीका त्यांनी यावेळी मंत्री छगन भुजबळांवर नाव न घेता केली आहे. तसेच राजकीय काम सुरू ठेवणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलले की, खचून जाऊ नका काम सुरू ठेवा, असेही त्यांनी म्हटले.
इतर महत्वाच्या बातम्या