Sahyadri Farms Nashik : नाशिकच्या सह्याद्री फार्म्सची वर्षभरात 1000 कोटी रुपयांची उलाढाल, भारतातील पहिली शेतकरी उत्पादक कंपनी, 28 टक्के वाढ
Nashik Sahyadri Farms : नाशिकच्या ‘सह्याद्री फार्म्स’ने (Sahyadri Farms) मार्च 2023 अखेर उलाढालीचा 1 हजार कोटीचा टप्पा पार केला आहे.
नाशिक : 2012 मध्ये 13 कोटी उलाढाल असलेल्या नाशिकच्या ‘सह्याद्री फार्म्स’ने (Sahyadri Farms) मार्च 2023 अखेर उलाढालीचा 1 हजार कोटीचा टप्पा पार केला आहे. यंदाच्या आर्थिक वर्षात मागील वर्षीपेक्षा 28 टक्के अधिक व्यवसायवृध्दी घेत 1007 कोटीची उलाढाल केली आहे. हा टप्पा गाठणारी भारतातील पहिली शेतकरी उत्पादक कंपनी बनली आहे. एकूणच जिल्ह्यासह राज्यभरातील शेतकऱ्यांचा विश्वास सार्थ ठरवला आहे.
नाशिक (Nashik) जिल्ह्यातील मोहाडी येथील सह्याद्री फार्म्स ही द्राक्ष उत्पादन व निर्यातीतील तसेच टोमॅटो प्रक्रियेतील (Tomato) देशातील प्रथम क्रमांकाची कंपनी असून हे ‘सह्याद्री फार्म्स’ने हे स्थान मागील 7 वर्षांपासून सातत्याने टिकवून ठेवले आहे. आपल्या व्यवसायात सह्याद्रीने जागतिक दर्जाची प्रमाणके आणली असून जागतिक द्राक्ष (Grapes) बाजारात स्थान निर्माण केलेली ‘सह्याद्री फार्म्स‘ ही फलोत्पादनातील महत्वाची भारतीय कंपनी म्हणून ओळखली जात आहे. कंपनीची 13 वी वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच पार पडली. यावेळी ‘सह्याद्री फार्म्स’चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विलास शिंदे (Vilas Shinde) यांनी कंपनीने 1 हजार कोटींचा टर्नओव्हर केल्याचे सांगितले. या वार्षिक सर्वसाधारण सभेला कंपनीचे 2 हजार शेतकरी सभासद, संचालक व कर्मचारी उपस्थित होते.
दरम्यान सहयाद्री फार्म्स हि शेतकऱ्यांसाठी काम करणारी कंपनी असून या मार्फत विविध पिकांवर काम करत कंपनीने हा पल्ला गाठला आहे. यात स्थानिक पिकांसह डाळिंब, केळी, आंबा, संत्रा, काजू, स्वीटकॉर्न (Sweetcorn) या पिकातही ‘सह्याद्री फार्म्स काम करीत असून या विविध पिकांतील 24.5 हजार शेतकरी म्हणून थेट कंपनीशी जोडले आहेत. 2012 मध्ये 13 कोटी उलाढाल असलेल्या ‘सह्याद्री फार्म्स’ने मार्च 2023 अखेर उलाढालीचा १ हजार कोटीचा टप्पा पार केला आहे. ‘सह्याद्री फार्म्स’ला जोडून अन्य 48 शेतकरी उत्पादक कंपन्या संलग्न आहेत, त्यांच्यामार्फत विविध फलोत्पादन तसेच प्रक्रिया प्रकल्पांवर काम सुरु आहे. तसेच 40 हजार एकर क्षेत्रातून येणाऱ्या 2 लाख 75 हजार 327 मे. टन उत्पादनावर प्रक्रिया व निर्यात केली गेली. याद्वारे निर्यातीतून सुमारे रुपये 352 कोटी उत्पन्न तर देशांतर्गत बाजारपेठेतून 655 कोटी उत्पन्न अशा प्रकारे एकूण 1007 कोटींच्या उलाढालीचा टप्पा गाठला. तसेच सुमारे 1300 पूर्णवेळ रोजगार व 4 हजार हंगामी रोजगार यातून निर्माण करण्यात कंपनीला यश आले आहे.
पावणे तीन टन शेतमालावर प्रक्रिया
सह्याद्री फार्म्सने मागील वर्षात 2 लाख 75 हजार 357 टन शेतमालावर प्रक्रिया केली आहे. यात 1 लाख 50 हजार 200 टन टोमॅटो, 48 हजार 706 टन द्राक्षे, 26 हजार 280 टन आंबा, 24 हजार 104 टन केळी, 5 हजार 300 टन स्वीट कॉर्न, 20 हजार टन इतर फळांवर प्रक्रिया करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विलास शिंदे यांनी म्हटलं की, ‘फलोत्पादनातील मुल्यसाखळी विकसित करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. मागील 12 वर्षांपासून ही वाटचाल सुरु असून ती एका महत्वाच्या टप्प्यावर आली आहे. देशाने दुध क्षेत्रात उत्पादन व वितरणाच्या बाबतीत जशी जागतिक पातळीवर स्वत:ची ओळख निर्माण केली आहे. आम्ही त्याच पध्दतीने फलोत्पादन क्षेत्रात काम करण्याचा प्रयत्न करीत आहोत. यातून महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील ध्येयनिष्ठ युवा शेतकऱ्यांना नक्कीच प्रेरणा मिळेल याची खात्री वाटते, असेही ते म्हणाले.
इतर महत्वाची बातमी :
कर्ता शेतकरी ।भाग २६। योग्य निर्णय कसा घ्यावा? । सह्याद्री फार्म्स