Nashik News : नाशिक जिल्ह्यातील सर्व बाजार समित्यामध्ये कांदा लिलाव सुरु, मागील तेरा दिवसांत काय काय घडल?
Nashik Onion Issue : नाशिक जिल्ह्यातील कांदा प्रश्नावर (Onion Issue) अखेर पालकमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांनी तोडगा काढत व्यापाऱ्यांच्या शिष्टमंडळाशी चर्चा केली..
नाशिक : गेल्या 13 दिवसांपासून नाशिक (Nashik) जिल्ह्यातील कांदा लिलाव पूर्णतः बंद होते. मात्र पालकमंत्र्यांनी काल सायंकाळी उशिरा व्यापाऱ्यांसोबत बैठक घेत कांदा प्रश्न सोडवला आहे. त्यानुसार आज सकाळपासून सर्वच बाजार समित्यांमध्ये कांदा लिलाव सुरु झाले आहेत. मागील तेरा दिवसांत व्यापाऱ्यांची बैठक, मंत्री मंडळाची बैठक, पालकमंत्र्यांची बैठक, शेतकऱ्यांची बैठक, त्यानंतर पुन्हा पालकमंत्र्यांची बैठक अशा सगळ्या घडामोडीनंतर कांदा लिलाव पुन्हा सुरु झाले आहेत. मात्र 13 दिवसात मात्र कोट्यवधींची उलाढाल ठप्प झाली होती, तर शेतकऱ्यांना मोठा फटका सहन करावा लागला.
नाशिक जिल्ह्यातील कांदा प्रश्नावर (Onion Issue) अखेर पालकमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांनी तोडगा काढत व्यापाऱ्यांच्या शिष्टमंडळाशी चर्चा केली.. 1 महिन्यात व्यापाऱ्यांच्या मागण्या पूर्ण करण्याचं आश्वासन मंत्री दादा भुसे यांनी दिलं आहे. त्यानुसार आजपासून कांदा लिलाव प्रक्रियेत व्यापारी सहभागी झाले असून गेल्या तेरा दिवसांपासून ठप्प असलेल्या बाजार समित्यांमध्ये (Nashik Bajar Samiti) लगबग सुरु झाली आहे. दरम्यान सर्वच बाजार समित्यांमध्ये कांदा यायला सुरुवात झालेली असून काही मोजकेच शेतकरी बाजार समित्यांमध्ये दाखल होत असल्याचे चित्र आहे. कारण कालच हा निर्णय झाल्याने अनेक शेतकऱ्यांना या निर्णयाबाबत माहिती नाही. गेल्या 13 दिवसांपासून व्यापाऱ्यांनी आडमुठी भूमिका घेऊन बंद पुकारलेला होता. या बंदमध्ये नेमकं साध्य काय केलं? असा सवाल उपस्थित होत असून याच समाधानकारक उत्तर व्यापाऱ्यांकडे नसल्याचे समोर येतंय.
दरम्यान 20 सप्टेंबर रोजी व्यापाऱ्यांनी अचानक कांदा लिलाव (Onion Auction) प्रक्रियेत सहभागी न होता संप पुकारला. त्यानंतर जिल्ह्यातील बहुतांश बाजार समित्यांमधील कांदा लिलाव ठप्प झाले. त्यानंतर व्यापाऱ्यांनी बैठक घेत जोपर्यंत सरकार आमच्या मागण्या मान्य करत नाही तोपर्यंत कांदा लिलाव प्रक्रियेत सहभागी होणार नाही अशी भूमिका घेतली. यासाठी सुरवातीला पालकमंत्री आणि जिल्हाधिकारी व व्यापारी यांच्यात बैठक झाली, मात्र ही बैठक निष्फळ ठरली. त्यानंतर पणन मंत्र्यांसह मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. यात अजित पवारांसह छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) हे देखील उपस्थित होते. मात्र या बैठकीत व्यापाऱ्यांचे समाधान झले नाही. त्याच दिवशी सायंकाळी वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांच्यासोबत मंत्रिमंडळाची बैठक झाली. मात्र यातूनही काही तोडगा निघू शकला नाही. पुढे हा संप सुरूच राहिला. त्यानंतर व्यापाऱ्यांनी पुन्हा येवल्यात बैठक घेऊन आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचे सरकारला सांगितले.
कांदा लिलाव सुरु झाले...
या सगळ्या घडामोडीनंतर शेतकऱ्यांनी बैठक आयोजित करत शेतकऱ्यांचे कसे नुकसान होते आहे, हे सरकारला सांगितले. मात्र यानंतरही व्यापारी वर्गाचा संप सुरुच होता. अखेर काल पालकमंत्री दादा भुसे यांनी नाशिकमध्ये कांदा व्यापाऱ्यांसोबत बैठक घेतली. या बैठकीमध्ये अनेक मुद्द्यांवर चर्चा करण्यात आल्याची माहिती देण्यात येत आहे. दरम्यान प्रशसनाने दिलेल्या अल्टिमेटमनंतर व्यापाऱ्यांनी एक पाऊल मागे घेण्याचा निर्णय घेतला. तर मंत्री दादा भुसे यांच्यासोबत चर्चा करुन व्यापाऱ्यांनी त्यांचा निर्णय जाहीर केला. त्यानुसार आजपासून सर्वच बाजार समित्यांमध्ये कांदा लिलाव सुरु झाले असून व्यापारी लिलावात सहभागी झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे आजपासून कांदा लिलाव सुरु झाल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण असून तेरा दिवस शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे, त्याचबरोबर 15 ते 20 कांदा शिल्लक असल्याने आता हळूहळू शेतकरी बाजार समित्यांमध्ये दाखल होत असल्याचे चित्र आहे.
शेतकरी भरडला गेला....
दरम्यान निर्यात शुल्क कमी करा, त्याचबरोबर नाफेडने बाजारात समितीमध्ये येऊन कांद्याची खरेदी करावी, अशा ज्या ज्या प्रमुख मागण्यांसाठी हा बंद पुकारण्यात आला होता. त्या निर्णयाबाबत कुठलाही आश्वासन थेट सरकारने दिलेले नाही, त्या संदर्भात व्यापाऱ्यांचे समाधान देखील झालेले नाही. त्यामुळे मुंबई दिल्ली अशा दोन ठिकाणी महत्त्वपूर्ण बैठका होऊन देखील व्यापाऱ्यांच्या हाती काही लागलं नाही. मग अचानक हा बंद त्यांनी मागे घेतला, ज्या शेतकऱ्यांचे गेल्या 13 दिवसापासूनच जे नुकसान झालेलं होतं. अनेकांचा कांदा चाळीमध्ये सडून गेलेला होता, अनेकांकडे पंधरा दिवस पुरेल एवढेच कांदा होता, मात्र आता तो कांदा कवडीमोल भावामध्ये विकावा लागत आहे. सडलेला कांदा फेकून देण्याची वेळ आलेली होती, त्यामुळे शेतकरी वेठीस धरला गेला. परंतु या बंदमधून व्यापाऱ्यांच्या हाती काय लागल हा महत्वाचा प्रश्न आहे. काल पालकमंत्री दादा भुसे यांच्या बैठकीत व्यापाऱ्यांनी एक महिन्याची मुदत दिली आहे. त्यानंतर पुढचा निर्णय आम्ही घेऊ असं व्यापाऱ्यांकडून सांगण्यात आलेलं आहे.
इतर महत्वाची बातमी :