(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nashik : मराठा क्रांती मोर्चाकडून नाशिक जिल्हा बंदची हाक; शहरात संमिश्र प्रतिसाद, कुठं-काय परिस्थिती?
Nashik Band : जालना (Jalna) येथील घटनेच्या निषेधार्थ सकल मराठा समाजाकडून नाशिक बंदची हाक देण्यात आली आहे.
नाशिक : जालना (Jalna) येथील घटनेच्या निषेधार्थ राज्यभरात संतप्त प्रतिक्रिया उमटत असून अनेक ठिकाणी आंदोलने (Andolan) करण्यात येत आहेत. तर आज अनेक जिल्ह्यात सकल मराठा समाजाकडून बंदची हाकही देण्यात आली आहे. तसेच आज नाशिकमध्येही सकल मराठा समाज आणि मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने बंदची हाक देण्यात आली असून आज सकाळपासून नाशिक (Nashik) शहरात बंदला संमिश्र प्रतिसाद बघायला मिळतो आहे.
गेल्या दोन दिवसांपासून जालना (Jalna Protest) येथील घटनेमुळे वातावरण बिघडले आहे. अनेक ठिकाणी मराठा समाज बांधवांकडून या घटनेबाबत रोष व्यक्त करण्यात येत आहे. तर अनेक ठिकाणी आंदोलने रास्ता रोको ही करण्यात आला आहे. आजही अनेक भागांत सकाळपासून आंदोलन सुरू असून काही भागांत मराठा क्रांती मोर्चाकडून बंदची हाक देण्यात आली आहे. नाशिकमध्ये (Nashik Band) देखील बंदची हाक देण्यात आली असून या बंदला संमिश्र प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे. शहरात बस स्थानकांसह मुख्य चौकांमध्ये पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून खबरदारीचा उपाय म्हणून कालपासून अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर आणि नंदुरबारची (Nandurbar) बससेवा बंद ठेवण्यात आली आहे. पोलिसांच्या सुचनेनुसार, बससेवेचा निर्णय घेतला जाईल असं परिवहन महामंडळाकडून सांगण्यात येत आहे.
दरम्यान, नाशिकमध्ये काल संभाजी ब्रिगेड (Sambhaji Briged), मराठा संघटनांकडून जिल्हाधिकारी कार्यालय, छत्रपती शिवाजी स्मारकासमोर आंदोलन करण्यात आले. यावेळी असंख्य बांधवांनी घोषणाबाजी करत जालना येथील घटनेचा निषेध केला. त्यानंतर आज सकल मराठा बांधव आणि मराठा क्रांती मोर्चाकडून नाशिक बंदची हाक देण्यात आली आहे. त्यानुसार आज सकाळी समाज बांधवांनी सकाळी 11 वाजता छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, जिल्हाधिकारी कार्यालय समोर, नाशिक येथे जमावे, सर्वप्रथम रॅली काढून स्वय:स्पूर्तीने नाशिकमधील सर्व व्यावसायिक, उद्योजक, इतर संस्था यांना बंद यशस्वी करण्याचे आवाहन करण्यात येणार आहे. अत्यावश्यक सेवा वगळता, व्यावसायिक व समाज बांधवांनी शांततेच्या मार्गाने बंद पाळावा, असे आवाहन मराठा क्रांती मोर्चाकडून करण्यात आले आहे. सकाळपासूनच बससेवा सुरु आहे, काही प्रमाणात दुकाने, व्यवसाय सुरु आहेत. तर काही ठिकाणी बंद पाळण्यात येत आहे. त्यामुळे नाशिकमध्ये बंदला संमिश्र प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे.
जिल्ह्यातील विविध भागात बंदची हाक
मराठा समाजाच्या आंदोलकांवर झालेल्या लाठीमाराच्या निषेधार्थ मराठा क्रांती मोर्चा, सकल मराठा समाज कळवण तालुक्याच्या वतीने शनिवारी शहरातील शिवतीर्थावरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारुढ पुतळ्याला अभिवादन करुन निषेध नोंदविण्यात आला. तरुणांवर लाठीहल्ला करणाऱ्या संबंधितावर कारवाई करावी, गृहमंत्र्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी मराठा समाजाच्या वतीने करण्यात आली. दरम्यान, या घटनेच्या निषेधार्थ रविवारी कळवण बंदची हाक देण्यात आली. तसेच जिल्ह्यातील विविध भागात बंदची हाक देण्यात आली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या :
Nashik Protest : नाशिकमध्ये संभाजी ब्रिगेड, स्वराज्य संघटना आक्रमक; जालना घटनेच्या निषेधार्थ आंदोलन