Manoj Jarange Nashik : छगन भुजबळांच्या येवल्यात मनोज जरांगेंची जाहीर सभा, सभेची तयारी पूर्ण, पोलिसांचा चोख बंदोबस्त
Manoj Jarange Nashik : मराठा आरक्षणाला (Maratha Aarkashan) विरोध केला तर सोडणार नाही, मग तो कुणीही असो, असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला आहे.
नाशिक : छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) माझ्या एकट्या विरोधात बोलतात, म्हणून आम्ही बोललो. आता ते म्हणतात की, आमच्या आरक्षणाला विरोध नाही, आम्हाला तेच पाहिजे होते. विनाकारण कोणाला टार्गेट करण्याचा माझा धंदा नाही. तसंही आरक्षण (Reservation) देऊ नका, असे बोलणारे तुम्ही कोण? असा सवाल करत कुणी मराठा आरक्षणाला (Maratha Aarkashan) विरोध केला तर सोडणार नाही, मग तो कुणीही असो असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला आहे. त्यातच आज येवला (Yeola) शहरात सभा होत असून या सभेची जय्यत तयारी करण्यात आली आहे. त्यामुळे या सभेत जरांगे काय बोलतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) गेल्या आठ दिवसांपासून महाराष्ट्र दौरा करत आहेत. काल सायंकाळी नाशिक शहरात दाखल होत त्यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी उपोषण करणाऱ्या आंदोलकांची भेट घेतली. यानंतर शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील छत्रपती शिवाजी स्मारकासमोर बसलेल्या उपोषणार्थींची भेट घेत मराठा बांधवाना आवाहन केले. त्याचबरोबर आज येवल्यात (Yeola Sabha) सभा होत असून तत्पूर्वी त्यांनी आज सकाळी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी जरांगे यांनी छगन भुजबळांवर नाव न घेता त्यांनी टीका करत मराठा आरक्षणाला विरोध नाही, असं त्यांनी म्हणताच आम्ही विषय सोडून दिला पण आरक्षणाला विरोध करणाऱ्यांना मी सोडणार नाही, तो कोणीही असो, मराठ्याची औलाद आहे, असे मनोज जरांगे यांनी म्हटले आहे.
मनोज जरांगे म्हणाले की, छगन भुजबळ यांनी स्वतः सांगितलं पाहिजे, गरीब मराठ्याच्या आरक्षण मिळू द्या. कारण छगन भुजबळ यांना पाच मराठ्यांनी तरी मदत केली, त्याची थोडीशी जाण ठेवून तरी गोरगरीब मराठ्याना आरक्षण द्या, असे म्हटले पाहिजे. त्याच्या भूमिकेमुळे त्यांना मदत करणारा सगळा मराठा समाज त्यांच्यावर नाराज होत आहे. ते इतका मराठा समाजाचा द्वेष का करतात, यासाठी मराठा समाजाने त्यांना मोठे केले का? छगन भुजबळ उच्च दर्जाचे सर्वात मोठे नेते आहेत, आम्ही कधी त्यांना तुम्ही वेगळ्या जातीचे आहेत. आमच्या बाप जाद्याने एकदा तरी त्यांना मदत केली असेल. आम्हीही ओबीसीत आहे, तुम्ही तुमचं खा, आम्हाला आमचे मिळू द्या, असंही ते म्हणाले. तुम्ही मोठ्या मनाने म्हणा, ग्राउंडवर आम्ही एकत्र येऊ, ओबीसी आणि मराठा आम्ही सोबत काम करतो. एकमेकांना मदत करतो, त्यामुळे विरोध करण्याचे कारण नाही, असं मनोज जरांगे यांनी म्हटलं आहे.
येवल्यात आज मनोज जरांगे पाटील यांची सभा...
मराठा-कुणबी समाजाच्या आरक्षणासाठी उपोषण केल्याने समाजाचे नवनेतृत्व म्हणून पुढे आलेल्या मनोज जरांगे पाटील यांनी राज्य दौरा सुरु केला आहे. आंदोलन सुरु असतानाच ओबीसी संघटना आणि समता परिषदेने मराठा समाजाला ओबीसींच्या आरक्षणात वाटा देऊ नये, अशी मागणी करीत आंदोलन केले. यामुळे भुजबळ आणि जरांगे यांच्यात ठिणगी पडली आहे. जरांगे यांच्या सभेसाठी पक्षभेद विसरून नेते व कार्यकर्ते एकवटले आहेत. त्यातच आज मनोज जरांगे पाटील यांची आज नाशिकच्या येवल्यात जाहीर सभा होणार आहे. येवला मतदारसंघ हा भुजबळांचा गेल्या 20 वर्षांपासून बालेकिल्ला राहिला आहे. या बालेकिल्ल्यात जरांगे पाटील यांच्याकडून विविध सभेत मंत्री छगन भुजबळांना टार्गेट करण्याचा प्रयत्न केला जात असल्याने खबरदारी म्हणून येवल्यातील भुजबळ यांच्या संपर्क कार्यालयाबाहेर पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला आहे.
इतर महत्वाची बातमी :
Manoj Jarange Nashik : छगन भुजबळांच्या येवल्यात मनोज जरांगेंची जाहीर सभा, सभेची तयारी पूर्ण