मोठी बातमी! मराठा समाजाला ठरलेल्या मुदतीत आरक्षण मिळणं अवघड; अडचणी काय?
Maratha Reservation News: अंतरवाली सराटी गावात उपोषण करणाऱ्या मनोज जरांगे यांनी सरकारला मराठा आरक्षणाचा मुद्दा मार्गी लावण्यासाठी 30 दिवसांचा वेळ दिला होता. पुढे आणखी दहा दिवस जरांगे यांनी सरकारला वाढवून दिलेत.
Maharashtra News: राज्यात मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) मुद्दा चांगलाच गाजत आहे. दरम्यान, मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी सरकारला 40 दिवसांची मुदत दिली आहे. मात्र, या 40 दिवसात आरक्षण मिळणे अवघड असल्याचं चित्र आहे. कारण जरांगे पाटील यांनी सरकारला 40 दिवसांची दिलेली मुदत 24 ऑक्टोबरला संपत आहे. तर, दुसरीकडे मराठवाड्यात आलेल्या मराठा आरक्षण समितीचा दौरा 23 ऑक्टोबरला संपत आहे. त्यामुळे एका दिवसात ही समिती मराठवाड्यातून जमा केलेले पुरावे सरकारकडे कसे सादर करणार? पुराव्यांची पुष्टी कशी करणार? आणि एका दिवसात अहवाल तयार कसा करणार? असे प्रश्न उपस्थित होत आहेत.
अंतरवाली सराटी गावात उपोषण करणाऱ्या मनोज जरांगे यांनी सरकारला मराठा आरक्षणाचा मुद्दा मार्गी लावण्यासाठी 30 दिवसांचा वेळ दिला होता. पुढे आणखी दहा दिवस जरांगे यांनी सरकारला वाढवून दिले. या 40 दिवसांची मुदत 24 ऑक्टोबरला संपत आहे. विशेष म्हणजे सरकारने नेमलेल्या शिंदे समितीचा याच काळात मराठवाडा दौरा आहे. या समितीचा शेवटचा दौरा 23 ऑक्टोंबरला संपणार आहे. 23 ऑक्टोबरला बीड येथील जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेऊन ही समिती आपला दौरा संपवणार आहे. त्यानंतर मराठवाड्यातील आठही जिल्ह्यातील घेतलेल्या बैठका, लोकांनी दिलेले पुरावे, प्रशासनाने शोधलेले पुरावे या सर्वांचा एकत्रित अभ्यास करून तो अहवाल सरकारला सादर केले जाणार आहे. पण हे सर्व एका दिवसांत शक्य आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे जरांगे यांनी सरकारला दिलेल्या मुदतीत आरक्षणाचा आदेश निघणे शक्य नसल्याचे बोलले जात आहे.
समितीच्या बैठकीचे वेळापत्रक
- छत्रपती संभाजीनगर: येथे बुधवार 11 ऑक्टोबर रोजी सकाळी 11.00 वाजता विभागीय आयुक्त कार्यालय येथे बैठक होणार आहे.
- जालना: येथे जिल्हाधिकारी कार्यालयात 12 ऑक्टोबर रोजी सकाळी 11.00 वाजता बैठक घेण्यात येणार आहे.
- परभणी: येथील जिल्हाधिकारी कार्यालयात 16 ऑक्टोबरला सकाळी 11.00 वाजता समितीची बैठक होणार आहे.
- हिंगोली : येथे 17 ऑक्टोबरला सकाळी 11.00 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथे बैठक होणार आहे.
- नांदेड: येथे 18 ऑक्टोबरला जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळी 11.00 वाजता ही बैठक होणार आहे.
- लातूर : येथे 21 ऑक्टोबरला जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळी 11.00 वाजता बैठक होईल.
- धाराशिव : येथे 22 ऑक्टोबरला सकाळी 11.00 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथे बैठक होणार आहे.
- बीड : येथे 23 ऑक्टोबरला सकाळी 11.00 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात समितीची बैठक होणार आहे.