(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nashik leopard : समृद्धी महामार्गावर अज्ञात वाहनाने धडकेत बिबट्याचा दुर्दैवी मृत्यू, दहा दिवसात दुसरी घटना
Nashik News : समृद्धी महामार्गावर रस्ता ओलांडत असलेल्या बिबट्याला (Leopard Death) प्राणाला मुकावे लागल्याची घटना घडली आहे.
नाशिक : समृद्धी महामार्गावर (Samruddhi Highway) अपघातांचे सत्र सुरूच असून वाहनांच्या अपघाताच्या (Accident) घटना नित्याच्या झाल्या आहेत. अशातच याच समृद्धी महामार्गावर रस्ता ओलांडत असलेल्या बिबट्याला (Leopard Death) प्राणाला मुकावे लागल्याची घटना घडली आहे. काल रात्री साडे नऊ वाजेच्या सुमारास इगतपुरीजवळील समृध्दी महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेतनर बिबट मृत्युमुखी पडला आहे.
राज्यातील समृद्धी महामार्गावर अपघातांचे (Samrudhi Mahamarg) सत्र सुरूच आहे. कधी आग भडकून, कधी टायर फुटून तर कधी डिव्हायडरवर धडकून झालेल्या अपघातांमध्ये (Accident) आजवर अनेकांचे जीव गेलेले असतांनाच शनिवारी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास इगतपुरीजवळ (Igatpuri) सिन्नरकडे जाणाऱ्या दिशेला समृध्दी महामार्गावर भरधाव वेगात जाणाऱ्या एका अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत बिबट नर प्राण्याचा मृत्यू (Leopard Accident) झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. बिबट्याच्या डोक्याला, पाठीला गंभीर ईजा पोहोचली होती. तसेच त्याच्या तोंडातून मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्रावही झाला होता. आजवर अनेक वन्यप्राण्यांना समृद्धी महामार्गावर आपला प्राण गमवावा लागला असून मुक्तसंचार करणंही त्यांच्या जीवावर बेतत असल्याचे दिसत आहे.
काही अवघ्या दहा दिवसांपूर्वीच नाशिकच्या (Nashik) सिन्नर (Sinner) येथील मोहदरी घाटात अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू झाला होता. नाशिक-पुणे महामार्गावर मोहदरी घाटात रस्ता ओलांडणाऱ्या बिबट्यास अज्ञात वाहनाने धडक दिली होती. सिन्नर नाशिककडे जाताना मोहदरी घाटाच्या सुरुवातीला असलेल्या वन उद्यानाच्या अगदी जवळ हा अपघात झाला होता. यानंतर अपघात करणारे वाहन घटनास्थळावरून पसार झाले. मात्र रस्त्यात पडलेला बिबट्या बघून थांबलेल्या काही वाहनचालकांच्या हा प्रकार लक्षात आला. त्यानंतर काल रात्री समृद्धीवर अपघातात बिबट्याचा मृत्यू झाल्याने रोड किल थांबणार तरी कधी असा सवाल वन्यजीव प्रेमींकडून केला जात आहे.
देवळाली कॅम्प परिसरात दर्शन
दरम्यान नाशिक शहर परिसरातील काही भागात बिबट्याचे दर्शन होत असल्याने नागरिकांच्या मागणीनुसार पिंजरे लावण्यात येत आहेत. देवळाली कॅम्प परिसरातील आनंद रोड मार्गावरील नवजीवन सोसायटी लगत गेल्या काही दिवसांपासून नागरिकांच्या नजरेस बिबट्या पडत आहे. याबाबत स्थानिक नागरिकांनी केलेल्या तक्रारीनंतर वन विभागाने पिंजरा लावला आहे. मागील आठवड्यात बिबट्याने रेस्ट कॅम्प रोडवरील चंद्रकांत कासार यांच्या बंगल्यात पडवीत कुत्र्याची शिकार केली होती. त्यामुळे सध्या बिबट्याचा मुक्काम आनंद रोड मार्गावरील नवजीवन सोसायटीलगत असल्याचं नागरिकांकडून सांगितलं जात आहे.
इतर महत्वाची बातमी :
Nashik Leopard : 'रोड किल' थांबणार कधी? भरधाव वाहनांच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू